Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे गटाने ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट दिले आहे. तर ठाकरे गटाकडून राजन विचारेंना उमेदवारी देण्यात आली आहे. याच दरम्यान आज राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादायक दावा केला. "एकनाथ शिंदेंना कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते. शिवाजी मैदानात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता. पण उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मी नरेश म्हस्केंना त्यांच्या घरी जाऊन समजावले. शिंदे आणि तुमचं जे असेल ते असेल पण शिवसेनेसाठी सोबत राहा. त्यावेळी नरेश म्हस्के राहिले," असा खुलासा राजन विचारे यांनी केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे स्वत: 2013मध्ये ४ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते!
"एकनाथ शिंदे स्वत: आमदार असताना 2013 साली काँग्रेसमध्ये चालले होते. ते कोणत्या पक्षाशी प्रामाणिक राहिले आहेत का? शिंदे आणि चार आमदार असे पाच जण पक्षप्रवेश करणार होतात. पण तेव्हा ते चार आमदार म्हणाले की आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार. त्यामुळे ते बंड फसलं. तुम्ही केवळ सेटिंग करत राहिलात. मनसे फोडली, भाजपा फोडली, काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकं फोडली. आज ठाणे जिल्ह्याची परिस्थिती काय झाली आहे ते बघा," असा गौप्यस्फोट राजन विचारेंनी केला
मी सामान्य कार्यकर्ता, माझ्याकडे 'खोके' नाहीत!
"२०१४ला एकनाथ शिंदे आपल्या मुलासाठी म्हणजेच श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यातील संपूर्ण शिवसेना घेऊन कल्याणमध्ये गेले होते. त्यावेळी अशा बातम्याही आल्या होत्या की शिंदे हे राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून कल्याणमध्ये प्रचार करण्यात व्यस्त आहेत. पण अशा परिस्थितीतही मी २०१४ आणि २०१९ ला निवडून आलो. मला निवडून येण्यासाठी पैसे खर्च करावे लागले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मला मोठे केले. मी सामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातील माणूस, माझ्याकडे खोके नव्हते," असा खोचक टोला विचारेंनी लगावला.
बंडाच्या वेळी शेवटपर्यंत मी शिंदेंसोबत होतो, पण...
"एकनाथ शिंदे यांची दोन मुलांचे जेव्हा निधन झाले तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता त्यावेळीही मी त्यांच्यासोबत होतो. विधानपरिषदेत जेव्हा बंड किंवा गद्दारी करण्याचा डाव सुरु होता, त्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायची ऑफर दिली होती. त्यांच्यासाठी बंगला सोडला होता. पण खुर्चीसाठीच हे सारं केलं गेलं. कारण तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती. ठाणेकरांना माहिती आहे की राजन विचार काय आहे, नरेश म्हस्के काय आहे आणि एकनाथ शिंदे काय आहेत?" अशी बोचरी टीका त्यांनी केली.
धर्मवीर चित्रपटावरून आरोपांना प्रत्युत्तर
"धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या खिशातून पैसे घालून काढला नाही. सर्व कार्यकर्त्यांनी पैसे जमवले होते. त्यांनी यात काहीच खर्च केलेला नाही. मी अनेकांना शो दिले होते. प्रत्येक विभागप्रमुखाला शो दिले होते. तुमच्याकडे त्यावेळी ठाणे महापालिका होती. तुम्ही आनंद दिघेंबद्दल काय सांगताय. तुम्ही आलात कधी... या राजन विचारेने तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे काढलेत आणि अजूनही पक्षाशी प्रामाणिक आहे. मी बोलत नाही, अजूनही बोललेलो नाही, मला बोलायला लावू नका," असा इशारा त्यांनी दिला.
अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?
"तुम्ही आणि नरेश म्हस्केंनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, टेंडर सेटिंग चालायचं. सर्व महापालिका रिकामी करून टाकली आहे. शासनाकडून पैसे घेऊन महापालिकेचा कारभार चालवावा लागतोय. महिन्यापूर्वी महापालिकेत फक्त १५ कोटी रूपये होते. शासनाकडून निधी आणून ही महापालिका चालवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीच्या पैशांवर डल्ला मारला आहेत. अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते? घरात हात धुवत बसले होते. पण आम्ही रस्त्यावर उतरलो. जनतेची सेवा केली. मनसेने आंदोलन केल्यानंतर नरेश म्हस्के बाहेर आले होते," असा खरपूस समाचार त्यांनी घेतला.