ठाणे - घोडबंदर भागातील थीम पार्कमध्ये ८२ टक्यांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला असतांनाच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे काम जर सव्वा दोन कोटीत केळकर करणार असतील तर त्यांनी ते करुन दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. परंतु हे आव्हान देत असतांनाच त्यांनी पालिका प्रशासनाची पाठराखण करीत कृष्णकृत्य करणाऱ्या त्या ठेकेदारावर निश्चितच कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सोमवारी आमदार केळकर यांनी थीम पार्कचा पाहणी दौरा केल्यानंतर या कामात ८२ टक्यांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेवर टिकास्त्र सोडले होते. त्यानंतर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी भाजपावर पटलावर केला होता. आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सुध्दा मैदानात उतरले असून त्यांनी सुध्दा या प्रकरणात भाजपालाच टारगेट केले आहे. बुधवारी सरनाईक यांनी सकाळीच या थीम पार्कचा पाहणी दौरा केला. या प्रकरणात भाजपा केवळ राजकीय पोळी भाजत असून, आता राजकारण खुप झाले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमची सुध्दा मागणी आहे. त्या ठेकेदावर कारवाई व्हावी, मग ती कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून करा किंवा अन्य कोणाकडूनही करा परंतु कारवाई व्हावी ही आमची सुध्दा इच्छा आहे. परंतु ज्या वेळेस हा ठराव स्थायी समितीत मंजुर झाला त्या वेळेस भाजपाचाच सभापती होता, मग त्यांनी याला त्यावेळेसच विरोध का केला नाही असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.तसेच या प्रकरणात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विविध प्रकल्पांची मागणी करीत असतो, प्रशासन त्यानुसार काम करीत असते. त्यामुळे प्रशासनाचा यात काही दोष आहे, असे म्हणने चुकीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकप्रकारे त्यांनी या प्रकरणात प्रशासनाला जवळ जवळ क्लिनचीटच दिल्याचे दिसून आले. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे, त्याच्यावर योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राष्टÑ पुरषांच्या पुतळ्यांची निगा देखभाल महापालिकेने राखावी असे आवाहन करतांनाच त्यांना ते जमत नसल्यास त्यांनी उद्यानांमध्ये राष्टÑ पुरुषांचे पुतळे उभारु नये असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी हे दोघेही अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता या दोघांनीही एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सेनेचे नेते आणि प्रशासकीय अधिकाºयांमध्ये एक तातडीची महत्वाची बैठक झाली. त्यात एकमेकांना सावरण्यासाठी एक अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार शिवसेनेची मंडळी आता पुढे येऊ लागली असून पत्रकार परिषद आणि पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार सरनाईक यांनी केळकर यांना आव्हान दिल्यानंतर भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि मिंिलद पाटणकर यांनी हे आव्हान स्विकारले असून आम्ही सव्वा दोनकोटीमध्ये काम करुन दाखवितो. परंतु ते काम केले तर सरनाईक यांनी या थीम पार्कसाठी झालेला 16 कोटींचा खर्च पालिकेला द्यावा असे आव्हान दिले आहे.