मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना आणि भाजपाचा वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांवर मारहाणीचे संस्कार आहेत. पहिलं उत्तर भारतीयांना, नंतर गुजराती, मुस्लिम यांना मारहाण केली मात्र तरीही आम्ही स्वीकारलं पण महिला महापौरांना शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदरमध्ये युती ठेवायची असेल तर प्रताप सरनाईक यांनी येऊन माफी मागितली पाहिजे अन्यथा या क्षणापासून आम्ही शिवसेनेसोबत काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
बाळासाहेब ठाकरे कलादालन प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी भाजपा रखडवत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिकांनी महापालिकेत महापौर दालनाची तोडफोड केली त्यावरुन भाजपा आमदार संतप्त झाले आहेत. शिवसेना भाजपाच्या आणि मोदींच्या नावावर जिंकत आली आहे. महिला महापौरांच्या केबिनमध्ये जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. तोडफोड करुन जनतेच्या पैशाचं नुकसान केलं हे तुमच्या घरातले पैसे नाहीत. एकीकडे महिला सन्मानाची वार्ता करता तर दुसरीकडे अशाप्रकारे महिलेला शिवीगाळ करता. हेच संस्कार आहेत का? उद्धव ठाकरे यांनी यांच्यावर कारवाई करावी असं आमदार नरेंद्र मेहतांनी सांगितले.
मीरा-भाईंदर पालिकेत सेनेचा राडा,भाजप नगरसेवकांना धक्काबुक्की
तसेच बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ठराव आम्हीच केला होता त्यासाठी महापालिकेचे २ कोटी आणि उर्वरित २३ कोटी खर्च राज्य सरकार देणार होती. प्रताप सरनाईक यांनी पाच वर्षात एक दमडी आणली नाही. अन् निवडणुकीच्या तोंडावर खोटं राजकारण करत आहेत. जनता यांना उत्तर देईल अशा शब्दात शिवसेनेवर आगपाखड केली आहे.
कलादालनाच्या मुद्यावर शिवसेनेकडून गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरु होता. काहीवेळा या कामाबाबत निधीच्या कमतरतेचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. मेहतांशी चर्चा करून निधी कमी पडल्यास मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे म्हटले होते. आयुक्तांशीदेखील चर्चा झाल्याने प्रशासनाने पत्र व गोषवारा दिला होता. पण भाजपने बाळासाहेब कलादालनाची निविदा मंजूर न करण्याचा पवित्रा कायम ठेवला. दरम्यान, मंगळवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्याआधीपासून शिवसेना नगरसेवक स्थायी समिती सभागृहात थांबले. भाजपचे सदस्य आले असता, आधी बैठकीत बाळासाहेबांच्या कलादालनाचा प्रस्ताव का नाही घेतला, असा सवाल करत, तो आधी घेण्याची मागणी त्यांनी केली. परंतु भाजप नगरसेवकांनी त्यास नकार दिला. त्यावरून बोलाचाली वाढल्या अन् त्याचं रुपांतर तोडफोडीत झालं.