कल्याण : कोरोना नियम पाळण्याच्या आवाहनाला शिवसेनेच्या माजी नगरसेवकानेच तिलांजली दिल्याचे चित्र शनिवारी कल्याणमध्ये पाहायला मिळाले. ५० जणांच्याच उपस्थितीला परवानगी असताना माजी नगरसेवक सुनील वायले आणि माजी नगरसेविका शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी दोन लग्नसोहळे होते. यात नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, याप्रकरणी वधुपिता वायले यांच्यासह अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि भवानी मॅरेज हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग यांच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन नियमांचे पालन करण्यास नागरिकांना सांगत आहेत. मात्र नियम पाळले जात नसल्यामुळे स्थिती भयावह हाेत आहे. अशातच नगरसेवकही नियमांना तिलांजली देत असून शनिवारच्या लग्नसोहळ्यातून हे समोर आले आहे. यातील एक लग्नसोहळा माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा होता. याप्रकरणी त्यांच्यासह तेथे पार पडलेल्या अन्य लग्नसोहळ्यातील वधुपिता सुरेश म्हात्रे आणि हॉलचे व्यवस्थापक रमेश सिंग अशा तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ना मास्क, ना डिस्टन्सिंगपश्चिमेतील काळा (भगवा) तलाव परिसरात पार पडलेल्या दोन लग्नसोहळ्यांना १०००च्या आसपास पाहुण्यांनी उपस्थिती लावल्याचे पोलिसांना आढळले. यात बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते की सोशल डिस्टन्सिंगही नव्हते.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकाकडूनच तिलांजली; लग्नसोहळ्यात तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 2:10 AM