लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मंगळवारी अनंत चतुर्दशी असताना अजूनही मीरा भाईंदर मधील रस्ते खड्ड्यात आहेत . रस्त्यांच्या कामात आणि पॅचवर्क मध्ये सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचा मोठा भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डयां विरोधात आंदोलने केली .
रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार चालवला आहे . रस्ते व पॅचवर्क ची कामे तांत्रिक निर्देश नुसार होत नसून वापरले जाणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे आहे . जेणे करून शहरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत ,
सर्वच लहान मोठ्या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य झाले आहे, शहरातील मुख्य रस्ता असलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्गाची तर चाळण झालेली आहे . गेल्यावर्षी मे. ए.आय.सी. इन्फ्रास्ट्रक्चर यांना ३५ कोटी रुपयांना खड्डे बुजविण्याचे कंत्राट दिलेले असून त्याच कंत्राटदाराला आता पालिकेने मुदतवाढ सुद्धा दिल्याचा आरोप शिवसेनेने केलाय .
दरवर्षी पालिका एकीकडे खड्डे बूजविण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा दावा करते तर दुसरीकडे खड्डे मात्र जैसे थे स्थिती झाली आहे. गणरायाचे आगमन व त्याला निरोप देखील भाविकांना खड्यातूनच द्यावा लागला . प्रवाशी व गाडीचालक या खड्ड्यांनी मेटाकुटीला आले आहेत .
भाजपा आणि पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शहरात शिवसेनेने ठिकठिकाणी खड्डयां विरोधात आंदोलन केले . आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक राजू भोईर, कमलेश भोईर, एलायस बांड्या , नगरसेविका हेलन जॉर्जी, शर्मिला बगाजी, जिल्हा संघटक स्नेहल सावंत , शहर प्रमुख पप्पू भिसे, शिवशंकर तिवारी , मुस्तफा वनारा , नेहा सिंग, अजित गंडोली, शिवा सिंह, इरफान खान आदी आंदोलनात सहभागी झाले होते .
शिवसैनिकांनी काही ठिकाणी भाडदे भरो आंदोलन केले . काही ठिकाणी खड्डयां मध्ये रोपांची लागवड केली . तर काही ठिकाणी कागदी होड्या सोडल्या . यावेळी टेंडर आणि टक्केवारीत सत्ताधारी भाजपा व प्रशंसा गुंतले असल्याने शहरातील रस्त्यांचे पार वाटोळे करून टाकले आहे असा आरोप सेनेचे नगरसेवक , पदाधिकारी यांनी केला .