भार्इंदर - मीरारोड येथील प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेल्या रामदेव पार्क मधील फेरीवाल्यांवर बुधवारी झालेल्या कारवाईवेळी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांची ‘माऊली’ नामक पावभाजी हातगाडी जेसीबीने तोडण्यात आली. त्यावेळी तेथील परप्रांतिय फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्याने शहरात भाषिक वाद पेटला आहे. या विरोधात शिवसेनेसह स्वाभिमान संघटना व मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांना गुरुवारी घेराव घालीत मराठी फेरीवाल्यांपुरती मर्यादित असलेल्या कारवाईची चौकशी करुन प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटील बनला असला तरी त्याचे पुनर्वसन नवीन बाजाराच्या वास्तूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नवीन बाजारात अधिकृत कि अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेणार, हा प्रश्न सध्या उपस्थित झाला असला तरी पालिकेने रामदेव पार्क परिसरात सुरू केलेल्या नवीन बाजारात सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी बहुतांशी परप्रांतिय फेरीवाल्यांचा भरणा केल्याचा आरोप सेनेकडून केला जात आहे. तसेच त्यांच्याकडून निश्चित दरापेक्षा अधिक बेकायदेशीर बाजार फी वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. यातून मराठी भाषिक तसेच अधिकृत फेरीवाल्यांना डावलल्याचा आरोप करुन आ. प्रताप सरनाईक यांनी त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तुर्तास हे आंदोलन अद्याप झाले नसल्याने मराठी भाषिक फेरीवाल्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजारात पुर्नवसन होऊनही अनेक परप्रांतिय फेरीवाले आजही रस्त्यावरच ठाण मांडत असल्याची चर्चा तत्कालिन महासभेत झाली होती. त्यावर कारवाई करण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले होते. त्यानुसार प्रभाग समिती ४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या नियंत्रणाखालील पथकाने बुधवारी येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यावेळी तेथील शिवसेना शाखेजवळ उपविभागप्रमुख विशाल मोरे व प्रशांत सावंत यांच्या ‘माऊली’ नामक पावभाजीच्या हातगाडीवरच पथकाने कारवाई करीत ती जेसीबीने पुर्णपणे चक्काचूर करण्यात आली. याखेरीज तेथील परप्रांतिय फेरीवाल्यांच्या हातगाडीवर पथकाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मोरे व सावंत यांनी करीत पथकाच्या या एकतर्फी कारवाईची माहिती त्यांनी पक्षाच्या वरीष्ठांना दिली.त्यानुसार सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शंकर विरकर, विभागप्रमुख प्रकाश मोरे, उपशहरप्रमुख पप्पू भिसे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राणे व मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, कृष्णा जाधव आदींच्या शिष्टमंडळाने गुरूवारी अतिरीक्त आयुुक्तांना घेराव घातला. पालिकेची मराठी भाषिकांपुरती मर्यादित केलेल्या कारवाईची चौकशी करुन प्रभाग अधिकाय््राावर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर अतिरीक्त आयुक्तांनी सरसकट फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.