ठाणे - ठाणे आणि कल्याण लोकसभेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असतांना आता शिवसेनेकडून वारंवार डावलले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. मुह मे मोदी का नाम और थाना मै बीजेपी बेनाम अशी गत शिवसेनेची असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. टिएमटीकडून महिला आणि जेष्ठांना सवलतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपला डावलण्यात आल्यानंतर केळकर यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा समाचार घेतला.
राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगले सुरु असतांना ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण हे आजही सुरुच असल्याचे चित्र आहे. एकीकडे ठाणे लोकसभा ताब्यात घेण्यावर शिवसेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात आता केळकर यांनी केलेल्या आरोपामुळे यात आणखी भर पडल्याचेच चित्र आहे. बुधवारी ठाण्यात टीएमटी बसच्या कार्यक्रमाला भाजपच्या मंडळींना डावलण्यात आल्याने केळकर संतप्त झाले आहेत. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असतांना शिवसेनेची ही आताची वेळ नसून ते वारंवार भाजपला डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुळात जेष्ठ नागरीकांना मोफत प्रवास आणि महिलांना सवलत ही भाजपचीच मागणी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपला हे नवीन नाही, यापूर्वी देखील अखंड शिवसेने सोबत २५ वर्षे आम्ही ठाणे महापालिकेत होतो, आता देखील विभक्त झाल्यानंतर एका शिवसेनेसोबत आहोत, परंतु शिवसेनेच्या एकतर्फी निर्णयाची, धोरणाची भाजपला सवय झाली असल्याचेही ते म्हणाले. मला या विषयावर बोलायचे नव्हते. परंतु सहन शक्तीला देखील मर्यादा असते, भाजपचा कार्यकर्ता हा स्वाभीमानी कार्यकर्ता आहे. परंतु वारंवार डावलण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यात भाजपचे नाव यांना ठाण्यात कुठेही नकोय म्हणून अशा पध्दतीने डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी देखील शिवशाही चषक, नमो महारोजगार मेळावा यांच्या जागा का बदलण्यात आल्या. असा सवालही त्यांनी केला आहे.
आता जाणता राजा प्रयोगाच्या जागाही शिवसेनेची नेते मंडळी करीत आहेत. सर्व कार्यक्रम हे कोपरी पाचपाखाडी भागातच खेचले जात असून ते चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. यात नोकरशाही हतबल असून महापालिका, जिल्हाधिकारी हे देखील हतबल असल्याचे ते म्हणाले. परंतु युतीचा धर्म पाळायचा असे केवळ बोलायचे मात्र प्रत्यक्षात दुसरेच कारयचे निवडणुकीच्या तोंडावर अशा पध्दतीने डावलने अयोग्य असल्याचेही ते म्हणाले. भाजपला अपमानीत करणे चालणार नाही, याचे परिणाम मग भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.
त्यांचा हा गैरसमज होतो, आजचा कार्यक्रम हा शिवसेना पक्षाकडून आयोजित केला होता. पक्षाने आनंद व्यक्त केला, तेथे लावण्यात आलेला बॅनरवर देखील त्यांच्या नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांचा गैरसमज दूर केला आहे. शिवशाही चषकासाठी १० वर्षे अर्ज करीत होतो, त्यानंतर तो ठाण्यात घेण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत नाही, त्या बाबतचाही गैरसमज दूर करण्यात आला आहे.