कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लीम समाजाची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजामध्ये वाद होऊ नये म्हणून याठिकाणी ईद निमित्त नमाज पठण होत असताना आरती व घंटानाद करण्याकरीता हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याचा निषेध म्हणून १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. दरम्यान राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेत पडलेले दोन गट पाहता यंदाच्या आंदोलनाबाबत उत्सुकता होती. परंतू सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात घोषणाबाजी आणि आरती करत घंटानादा आंदोलन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ते आजतागायत दरवर्षी सुरू आहे. आज सकाळीच शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेकडील टिळक चौक शहर शाखेतून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केला होता. लालचौकी याठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता यावेळी आरती देखील करण्यात आली. आरती नंतर पोलिसांनी आंदोलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मग त्यांच हिंदूत्व खोट आहे का! -आनंद दिघे यांनी सुरू केलेले हे आंदोलन तीस वर्षांपासून सुरू आहे, घटनेने हिंदूंना दिलेला दर्शनाचा अधिकार हिरावला जातोय, यावर्षी आम्हाला अपेक्षा होती. कधीकाळी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे, पक्षप्रमुखांना खाली उतरवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्यांनी हा अन्याय दूर करायला पाहिजे होता, जर खरे हिंदुत्व असते तर मंदिर उघडायला पाहिजे होते, त्यांचे हिंदुत्व खोटे आहे का? हा प्रश्न आज पडलाय. हे सरकार जर हिंदुत्ववादी आहे, तर हा अन्याय दूर करायला पाहिजे होता, असा टोला एकनाथ शिंदे यांना नाव न घेता महानगरप्रमुख विजय साळवी यांनी यावेळी लगावला.