लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्याच्या राजकारणात विळ्याभोपळ्याचे नाते असलेल्या भाजपला ठाणे जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापतीपद देऊन शिवसेनेने विरोधी पक्षच ठेवला नसल्याचे गुरुवारी विषय समित्यांच्या निवडणुकीत सिद्ध झाले. यावेळी शिवसेनेने दोन सभापतीपदे स्वत:कडे ठेवून मित्रपक्ष राष्ट्रवादीला एक आणि भाजपला एक सभापतीपद देऊन जिल्हा परिषदेत दिलजमाई केली.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रत्नप्रभा तारमळे आाणि बांधकाम, आरोग्य समिती सभापतीपदी शिवसेनेचे कुंदन पाटील, राष्ट्रवादीचे शहापूरचे संजय निमसे यांची कृषी सभापतीपदी, तर मुरबाडच्या भाजप सदस्या नंदा उघडा यांची समाजकल्याण समिती सभापतीपदी निवड झाली.
विरोधी पक्षच न राहिल्यामुळे सभापतीपदाची ही निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी कामकाज पाहिले. ठाण्यातील गोयंका इंटरनॅशनल स्कूल येथे कोविड-१९ संदर्भात शासनाने दिशानिर्देशित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या निवडणुका झाल्या. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने यांनी अभिनंदन केले.नव्या सभापतींचे मतदारसंघ : महिला, बालकल्याण सभापतीपदी तारमळेमहिला व बालकल्याण समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या रत्नप्रभा तारमळे ( शिवसेना) या खारबाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.याशिवाय समाजकल्याण सभापतीपदी विराजमान झालेल्या नंदा उघडा (भाजप) या वैशाखरे गटातून निवडून आल्या आहेत.बांधकाम, आरोग्य समिती सभापतीपदी निवडून आलेले कुंदन पाटील (शिवसेना) हे पूर्णा गटातून, तर संजय निमसे (राष्ट्रवादी) हे चेरपोली गटातून निवडून आलेले आहेत.