कल्याण : बकरी ईदच्या दिवशी शहरातील दुर्गाडी किल्ल्याला लागून असलेल्या जागेत मुस्लिमधर्मीय नमाजपठण करतात. यावेळी हिंदूंना दुर्गाडीदेवीच्या मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मंदिरबंदीचा हुकूम मोडण्यासाठी शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे सोमवारी सकाळी येथे घंटानाद आंदोलन केले. यावेळी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी लालचौकी येथेच रोखून धरले. तसेच अनेकांना अटक करून मानपाडा पोलीस ठाण्यात नेऊन त्यानंतर त्यांची सुटका केली.ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या घंटानाद आंदोलनात आमदार शांताराम मोरे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महिला आघाडीच्या विजया पोटे, नगरसेवक सचिन बासरे, माजी नगरसेवक कैलास शिंदे, दीपक सोनाळकर आदी सहभागी झाले होते.शिवसैनिकांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास वंदन करून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने वाट धरली. यावेळी पोलिसांनी त्यांना लालचौकी येथे रोखून धरले. शिवसैैनिकांनी तेथेच आरती केली. त्यांनी पोलिसांचा विरोध न जुमानता मंदिराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही.मंदिराच्या नजीक ईदगाहची लहानशी जागा आहे. दोन्ही धर्मांनी त्यावर हक्क सांगितला आहे. बकरी ईदच्या दिवशी नमाजपठणाच्या वेळी मंदिरात आरती करण्यास हिंदूंना मनाई आहे. त्याच्या निषेधार्थ दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या काळापासून हे आंदोलन होत आहे. मात्र, यंदा कोल्हापूर, सांगली या भागाला पुराचा फटका बसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी तेथे तळ ठोकला आहे. त्यामुळे शिंदे आणि लांडगे सोमवारी आंदोलनात सहभागी झाले नव्हते.
कल्याणमध्ये शिवसेनेचे ‘घंटानाद’, कार्यकर्त्यांना अटक व सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:17 AM