ठाणे - मागील नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणुक अखेर लागली आहे. ठाणे महापालिकेने येत्या २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणुक प्रक्रिया घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार पाच समित्यांवर शिवसेनेच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर एक प्रभाग समिती भाजपाच्या वाटेला आली आहे. तर कळवा आणि मुंब्यावर राष्ट्रवादीचा कब्जा असणार आहे. परंतु कळव्यात शिवसेनेने देखील अर्ज भरल्याने येथे काहीशी चुरस निर्माण झाली आहे. तर नौपाड्यातही शिवसेनेच्या विरोधात भाजपाने अर्ज भरला आहे.ठाणे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या देखील निवडणुका रखडल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचे विकें द्रीकरण व्हावे यासाठी ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार प्रभाग समितीची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता तब्बल नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. दहा प्रभाग समिती एकने कमी करुन नऊ करण्यात आल्या. त्याची निवडणुक आता २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता महापालिकेत घेतली जाणार आहे. त्यानुसार बुधवारी या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार कोपरी- नौपाडा येथे शिवसेना आणि भाजपात चुरस लागली आहे. येथे शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड, तर भाजपाच्या वतीने सुनेश जोशी यांनी अर्ज भरला आहे. येथे शिवसेनेचे संख्याबळ नऊ असून भाजपाचे संख्याबळ सात आहे. त्यामुळे ही प्रभाग समिती देखील शिवसेनेच्या वाटेला जाणार हे निश्चित मानले जात असले तरी आम्ही शिवसेनेची दोन मते फोडू असा विश्वास भाजपाला वाटत आहे. दुसरीकडे कळव्यातही राष्ट्रवादी प्रभाग समितीवर कब्जा करणार असली तरी येथे शिवसेनेच्या वतीने पुजा करसुळे यांनी अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने महेश साळवी यांनी अर्ज भरला आहे. उथळसर प्रभाग समितीत मात्र भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने शिवसेनेने येथे अर्जच भरला नाही. त्यामुळे भाजपाच्या नंदा पाटील यांची निवड बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. वागळेसाठी माणिक पाटील, माजिवडा मानपाडासाठी सिधार्थ ओवळेकर, वर्तकनगर - रागीणी बैरीशेट्टी, लोकमान्य सावरकरनगर - कांचन चिंदरकर, नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीत शैलेश पाटील या सर्व शिवसेना नगरसेवकांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर मुंब्रा प्रभाग समितीसाठी अनिता केणी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला आता कळवा आणि नौपाड्यासाठी काहीशी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.
पाच प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा कब्जा, राष्ट्रवादीकडे एक तर भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 4:49 PM
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका अखेर लागल्या आहेत. येत्या २२ या निवडणुकीची प्रकिया पार पाडली जाणार असली तरी बुधवारी यासाठी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानुसार पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना, एका ठिकाणी शिवसेना विरुध्द भाजपा तर कळव्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. परंतु एका प्रभाग समितीवर भाजपाने आपला कब्जा केला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्यालाही मुंब्रा प्रभाग समिती आली आहे.
ठळक मुद्देनौपाड्यात शिवसेना विरुध्द भाजपात लढतकळव्यात राष्ट्रवादीला शिवसेनेची टक्करकपाच प्रभाग समित्या शिवसेनेच्या वाटेलाभाजपाला मिळाली एक प्रभाग समिती