बदलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन अर्ज आल्याने अॅड. प्रियेश जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. भाजपच्या राजश्री घोरपडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.भाजप-शिवसेनेत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाल्याने निवडणुकीची संधी साधत भाजपने सेनेसोबत सत्तेत वाटेकरी होण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीनंतर पालिकेत शिवसेना-भाजपने जल्लोष केला.
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने थांबली होती. अखेर, निवडणूक आयोगाने ही निवडणूक घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देताच दि. २ मे रोजी ही निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजता पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंह गिरासे यांनी कामकाज पाहिले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अॅड. प्रियेश जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या राजश्री घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली.भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सत्तेत सहभाग घेतला. गेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला उपनगराध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांची मने पुन्हा जुळल्याने त्यांनी पालिकेतील सत्तेकरिता युती केली. त्यामुळे आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. नगराध्यक्षपदी जाधव यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी पालिकेबाहेर जल्लोष केला. नगराध्यक्षांना पदभार देण्यासाठी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख वामन म्हात्रे हजर होते.