- नितिन पंडीतलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पक्ष नेतृत्व कडून संशय व्यक्त केला जात असल्याने अपमानित होऊन राहण्यापेक्षा शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदासह शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यता पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सोमवारी प्रकाश पाटील यांनी पडघा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांच्या या घोषणानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये पडसाद उमटणार असून अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे पाटील यांच्या निर्णयाने व्यथित झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा मध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले. त्यात माझा कोणताही सहभाग नसताना पक्ष नेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय व्यक्त करीत अविश्वास व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण व्यथित असून तब्बल ३५ वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम करीत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्या सारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्या पेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी म्हटले. तूर्तास एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार का या प्रश्नावर मी संघटनेत केलेल्या कामाचे महत्व ओळखून कोणी आपणास विचारणा केली तर भविष्यात त्या बाबत निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे .