भिवंडी : कोटरगेट मशिदीसमोरील वादग्रस्त जागेवर निजामपूर पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे. या जागेवर पोलीस ठाणे म्हणून सुरूवातीपासून आग्रही असलेल्या शिवसेनेने आता पोलीस ठाणे बांधण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर मात्र आश्चर्यकारकरित्या यू टर्न घेतला आहे. एरव्ही ‘करून दाखविले’ असे फलक लावणाऱ्या शिवसेनेने या निर्णयाचे कौतुक करणे सोडा, उलट पोलीस ठाण्याची जागा बदलण्याची भूमिका घेतल्याने तोही चर्चेचा विषय बनला आहे.वादग्रस्त जागेवर पोलीस ठाणे व्हावे, म्हणून शिवसेना आग्रही होती. तो मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने राजकारण केले. पण आता निजामपूर पोलीस ठाणे गंगाजमुना सोसायटी कंपाऊंडमध्ये आणि शहर पोलीस ठाणे रामेश्वर मंदिराशेजारी पोलिसांसाठी ठेवलेल्या राखीव जागेत बांधावे, अशी भूमिका शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे केले आहे.कोटरगेट मशिदीसमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असताना ५ जुलै २००६ ला ते काही नागरिकांनी थांबवले आणि त्यातून दंगल पेटली. या दंगलीवेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा बळी गेला, तर रात्रीच्यावेळी बागेफिरदोस या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ठेचून मारण्यात आले. जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतरही या जागेच्या मालकीबाबत उच्च न्यायालयात धाव घेत स्थानिक नागरिकांनी वेगवेगळे दावे केले. पण या याचिकांचा निकाल सरकारच्या बाजूने लागून ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सिध्द झाले. दरम्यानच्या काळात शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत त्याच जागी पोलीस ठाणे व्हावे, अशी भूमिका घेतली. आता ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा उपायुक्त मनोज पाटील यांनी केली. पण हवा तसा विषय मार्गी लागूनही शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. दोन पोलिसांची हत्या झाल्याने शिवसेना या पोलीस ठाण्याच्या बांधकामाबाबत आक्रमक झाली होती. एवढेच नव्हे, तर पोलिसांचे मानसिक बळ वाढविण्यासाठी हुतात्मा झालेल्या दोन पोलिसांच्या कुटुंबियांना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ येथे घर देत आर्थिक मदतही केली. मात्र वादग्रस्त जागेवर पुन्हा बांधकाम सुरू करण्याबाबत काही नेत्यांनी उदासीनता व्यक्त केली. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा यू टर्न
By admin | Published: April 19, 2017 12:27 AM