कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरु केलेल्या घनकचरा व्यवस्थापन कर वसूली प्रकरणी भाजपने पालकमंत्र्यांवर निशाणा साधून त्यांच्या विरोधात शहरात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीला शिवसेने प्रतिउत्तर देत भाजपनेच लागू केला आहे कर आणि आत्ता भाजपच उलटय़ा बोंबा मारत असल्याची टिका शिवसेनेकडून केली जात आहे.
शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन कर हा भाजप सरकारच्या काळात लागू करण्यात आला. कर वसूलीचा जीआर काढला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या मंत्री मंडळात भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण हे राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बॅनरबाजी करुन त्यांना लक्ष्य करणो म्हणजे भाजपच्या उलटय़ा बोंबा असल्याचा प्रकार आहे. भाजपचा हा खोटारडेपणा आहे. भाजप सरकारने जीआर काढला तेव्हा आमदार चव्हाण यांनी विरोध का केला नाही. कर लागू होऊन वसूली सुरु झाली तेव्हा आमदारांना जाग आली आहे का असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने लागू केलेला कर आणि त्याची वसूली ही रास्त नाही. ही बाब आम्ही मान्य करतो. कारण सध्या कोरोना काळात जनता आर्थिक विवंचतनेत आहे. शिवसेना जनसामान्यांच्या पाठिशी कायम असते. काय चांगले आणि काय वाईट हे भाजपने शिवसेनेला शिकवू नये असा सल्लाही या निमित्ताने म्हात्रे यांनी दिला आहे.
दरम्यान कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यासंदर्भात सांगितले की, महापालिकेकडून लागू करण्यात आलेला कर हा अयोग्य आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन हा कर रद्द करण्यासंदर्भात विचार विनीमय केला जाईल. ज्या गोष्टीमुळे नागरीकांना त्रस होईल. त्याला आमचा कायम विरोध राहणार आहे.