ठाणे : कचराळी तलाव परिसरात पाचपाखाडीतील ठामपा प्रभाग क्र. 12 च्या नगरसेविका रुचिता राजेश मोरे व ठामपा परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवचरीत्रे ठाणेकरांसाठी ' शिवपर्व ' या मोफत वाचनास उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाचनालयाचा शुभारंभ शनिवारी ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलतज्ञ दा . कृ . सोमण यांच्या हस्ते झाले .
तरुणपिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पाचपाखाडी भागात नगरसेविका रुचिता राजेश मोरे व ठामपा परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले मोफत वाचनालय हे मोलाची भूमिका बाजवणार आहेत . आज शहरात विविध सुखसोयी निर्माण केल्या जातात . मात्र त्याबरोबरीने पुढील पिढी देखील घडवणे अतिशय महत्वाचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पंचांगकर्ते दा . कृ . सोमण यांनी केले. त्यावेळी सोमण बोलत होते , दिवाळी काही दिवसांवर आली आहे , या पार्श्वभूमीवर मोरे यांनी मोफत वाचनालयाच्या माध्यमातून ठाणेकर नागरिक आणि तरुणपिढीला शिवचरित्र उपलब्ध करून ज्ञानाचा दिवा लावला असल्याचे सोमण यांनी नमूद केले. इतर प्रभागातील नगरसेवकांनी या वाचनालयापासून प्रेरणा घेऊन आपापल्या प्रभागात या धर्तीवर वाचनालय सुरु करावे असे आवाहन सोमण यांनी केले. यासाठी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तरुणपिढीने विविध लेखकांनी महाराजांवर लिहलेली पुस्तके वाचून त्यातून प्रेरणा घेऊन इतिहासाचा धांडोळा घ्यावा यासाठी हे वाचनालय सुरु केले असल्याचे राजेश मोरे यांनी सांगितले. सदर वाचनालय सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सर्व वाचकप्रेमीसाठी सुरु राहणार असून त्यात शिवचरित्रावर आधारित जवळपास १५० पुस्तके आहेत . या वेळी रामदास खरे लिखित प्रभो शिवाजी राजे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . यावेळी नगरसेविका रुचिता राजेश मोरे , ठामपा परिवहन समिती सदस्य राजेश मोरे , सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे , व्यास क्रिएशन्स चे संचालक निलेश गायकवाड ,यांच्यासह इतर उपस्थित होते.