ठाणे : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात २४ हजार ३५५ ठाणेकरांनी ‘शिव’थाळीचा आस्वाद घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीसाठी मागणी होऊ लागल्याने त्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात १० रूपयांच्या थाळ्यांची संख्याही दोन हजार ७०० इतकी झाली आहे.थाळी वाटप केंद्रांची संख्याही वाढली असून, ती सातवरून १२ वर पोहोचली आहे. त्यामुळे १ मार्चपर्यंत एकूण २८ हजार ६८६ थाळ्यांचे वाट झाले आहे. तसेच वाढलेल्या थाळी वाटपासाठी आणखी पाच केंद्रांची गरज भासणार असून ते केंद्रही मार्च अखेरपर्यंत सुरू होतील असा विश्वासही संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. २६ जानेवारी रोजी राज्यात शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई येथील सात केंद्रांवर साधारणत: एक हजार ३५० थाळ्यांपैकी ६७५ थाळ्यांचे वाटप सुरू झाले होते. मात्र, जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या महापालिका हद्दीत काही तांत्रिक अडचणीमुळे केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. याचदरम्यान महिनाभरात २४ हजार ३५५ इतक्या थाळ्या त्या सात केंद्रांवर वाटप झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
ठाण्यात ‘शिव’थाळ्यांची संख्या झाली दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:15 AM