ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर बुधवारी रात्री दीड वाजण्याचा सुमारास एकट्याच फिरणाऱ्या कुर्ल्यातील नऊ वर्षीय सफीउल्ला या (दिव्यांग) विशेष मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अवघ्या २४ तासांत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. आईला पाहताच मोठ्या प्रमाणात आवाज देऊन त्याने तिला आनंदाने मिठी मारली.ठाण्यातील फलाट क्रमांक-३ वर एक दिव्यांग मुलगा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याची माहिती एका दक्ष प्रवाशाने ठाणे लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही.जी. कुंभार आणि पोलीस हवालदार माया माळी व पोलीस नाईक एम.वाय. कलंबे यांनी त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, दिव्यांग असल्याने त्याला आपले नावही व्यवस्थित सांगता येत नव्हते. याचदरम्यान, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी कल्याण ते सीएसएमटी या रेल्वे पोलिसांसह रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून कोणी मुलगा हरवला आहे का, याची विचारपूस केली. त्या वेळी मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांनी एक मुलगा हरवल्याची माहिती देण्यासाठी एक महिला आल्याचे सांगितले. त्यानुसार, लोहमार्ग पोलिसांनी त्या महिलेशी संपर्क साधून त्यांना मुलाबाबत माहिती दिली. त्या वेळी त्यांनी तो आपलाच मुलगा असल्याचे स्पष्ट केल्यावर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी सकाळी त्या मुलाला आईच्या स्वाधीन केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.चोवीस तासांत शोधसफीउल्ला हरवल्याची चुनाभट्टी पोलीस ठाण्यात फक्त नोंद पोलिसांनी करून घेतली होती. परंतु, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो २४ तासांत पुन्हा स्वगृही परतल्याची माहिती पोलिसांनी दिली.>निघून जाण्याचीत्याची तिसरी वेळसफीउल्ला हा यापूर्वीही दोन वेळा घरातून असाच निघून गेला होता. मात्र, तो घराच्या आजूबाजूला मिळून येत असे. परंतु, बुधवारी त्याची आई त्याच्या लहान भावाला शाळेतून आणण्यासाठी गेल्यावर तो घरातून निघून रेल्वे स्थानक ात आला. तेथून तो लोकलमध्ये बसून ठाण्यात आला असावा, असा अंदाज आहे.
कुर्ल्यातील दिव्यांग मुलगा सापडला ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:30 AM