मुंबई - काँग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांच्या हाती भगवा दिला. निर्मला गावित यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर, आमदार सदा सरवणकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश एक दिवस लांबणीवर पडला होता.
मुंबईतील मातोश्री बंगल्यावर जाऊन या दोन्ही नेत्यांनी शिवधनुष्य पेलण्याचं वचन घेतलं आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला होता. आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सेना प्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी दुपारी 4 वाजता मातोश्रीवर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, मतदारसंघातून मोठ्या संख्येने गावित समर्थक मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु, सेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मातोश्रीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे निर्मला गावित आणि रश्मी बागल यांचा आज पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडला.
दरम्यान, गेल्या १३ वर्षांपासून शरद पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आलो. त्यांचे व आमचे नाते एक नेता व कार्यकर्त्याच्याही पलीकडे आपुलकीचे आहे़ ते नाते कायम ठेवत जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. तसेच, तो लपून-छपून न घेता नेतेमंडळींना माहिती देऊन आणि पत्र लिहून घेतलेला असल्याचे स्पष्टीकरणही बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी दिले.