डोंबिवली - गणेशोत्सव मित्र मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडत असतो, ती एक कार्यशाळा असून त्यातून अनेक उदयोन्मूख कार्यकर्ते राजकारणासह समाजकारणाला मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्यात स्व. धर्मवीर आनंद दिघे, तसेच राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा भरवून समाजात एक चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले. ते कार्य शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेनेचे नासिक जिल्हा संपर्कप्रमुख आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी करत आहेत. त्यांचे कार्य वाढत जावो अशा शब्दात डोंबिवलीचे प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी कौतुक केले. येथील शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या श्री गणेशदर्शन स्पर्धेमध्ये गोग्रासवाडी भागातील शिवनेरी गणेशोत्सव मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक आला.बुधवारी हा पारितोषिक वितरण समारंभ टिळक पथ येथील ब्राह्मण सभेमध्ये संपन्न झाला. त्या सोहळयात पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन पटवारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. त्या स्पर्धेतच राजाजीपथ गणेशोत्सव मंडळाचा द्वितीय तर पश्चिमेकडील गोकूळ मित्र मंडळाला तृतिय क्रमांकाचे मानकरी म्हणुन गौरविण्यात आले. तसेच दत्तनगर येथील शास्त्री हॉलमध्ये भरविण्यात येणा-या गणेशोत्सव मंडळाला आणि सुनिलनगर गणेशोत्सव मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. श्रींच्या आकर्षक मूर्तीसाठी पश्चिमेच्या जाधववाडी मित्र मंडळ आणि विशेष पारितोषिक गणेश अपार्टमेंट मित्र मंडळाला देण्यात आले.प्रथम क्रमांक पटकावणा-या मंडळाला रोख रक्कम ३१ हजार, द्वितीय २१ हजार रोख, तृतिय क्रमांकाला ११ हजार रूपये तर उत्तेजनार्थ आणि आकर्षक मूर्तीसाठी ५ हजार रूपये रोख रक्कम देण्यात आली. गणेश मित्र मंडळाला अडीच हजार रूपयांचे पारितोषिक व सगळया विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देखिल देण्यात आले. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती राहुल दामले, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक दिपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड आदींसह मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानचे ललित शाईवाले, राज परब आदीही उपस्थित होते. प्रख्यात व्यंगचित्रकार जोशी, कलेचे अभ्यासक शिक्षक विवेक ताम्हणकर वास्तूविशारद निनाद वैद्य, पत्रकार अनिकेत घमंडी आदींनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन काम पाहिले होते. यावेळी खासदार शिंदे, भाऊसाहेब चौधरींसह परिक्षकांची मनोगते व्यक्त झाली. याही वर्षी अशाच पद्धतीने स्पर्धा भरविण्यात येणार असून यंदा १०० मंडळ सहभागी होतील असे उद्दीष्ट असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या गणेश दर्शन स्पर्धेत शिवनेरी मित्र मंडळ अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 3:26 PM