कल्याण : कोरोनाकाळात ज्या मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा २५ मुलांचे पालकत्व स्वीकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. पालकत्व घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे.
शिवनिकेतन ट्रस्टतर्फे भारतीय सैनिकी विद्यालय १९९५ पासून चालविले जात आहे. या शाळेत इयत्ता पाचवी ते १२ वी पर्यंतचे वर्ग चालविले जातात. त्यात सध्या २५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी या शाळेतून १३५ मुलांनी पूर्ण शिक्षण घेतले आहे. शाळेची इमारत खडवली येथे असून, तेथे वसतिगृह, स्वयंपाकगृह, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, व्यायाम शाळा, फायरिंग रेंज, वैद्यकीय तपासणी या सुविधा आहेत.
शिंदे यांनी सांगितले की, कोरोनाचा फटका समाजातील सर्व वर्गाला बसला आहे. कोरोनामुळे दोन हजार ९१५ मुलांनी त्यांच्या पालकांना गमावले आहे. त्यापैकी ११४ बालकांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यापुढे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. ११४ बालकांपैकी २५ बालकांचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी शिवनिकेतन संस्थेची आहे. या २५ मुलांचे इयत्ता सहावी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण, राहण्या-खाण्याचा खर्च केला जाईल. सरकारकडून या २५ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची परवानगी ट्रस्टतर्फे मागितली आहे. सरकार ही परवानगी देईल, याचा विश्वास असल्याचेही शिंदे म्हणाले.
---------------