ठाणे : ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प हे नव्या रूपात ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. या शिल्पाचे काम सुरू असून, ते मे २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. या शिल्पाचे क्ले स्वरूपातील प्रारूप चित्राचे सादरीकरण बुधवारी महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले. या वेळी आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागावर शिवराज्याभिषेकाचे शिल्प बसविले आहे. परंतु, ते २५ वर्षे जुने असल्याने बहुतांशी जीर्ण झाले होते. यासाठी सर्व स्तरातून ते नव्याने बसविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी मागील वर्षभर प्रशासनासोबत बैठका घेऊन सदर शिल्पाबाबत महापौरांनी पाठपुरावा केला. याकामी मे. गार्नेट इंटेरियर्स या कंपनीची नियुक्ती केली असून तिने प्रारूप शिल्प तयार केले आहे. या शिल्पामध्ये काही किरकोळ दुरुस्तीबाबत सूचना करण्यात आल्या. अत्यंत आकर्षक स्वरूपात भव्यदिव्य शिल्प साकारण्यात येत असून, यामध्ये कोणाशी स्पर्धा करण्याचा हेतू नाही, असे म्हस्के म्हणाले.
याप्रसंगी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, भाजपचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका साधना जोशी, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, नगर अभियंता रवींद्र खडताळे, कार्यकारी अभियंता सदाशिव माने आदी उपस्थित होते.
‘संपूर्ण देशात देखणे शिल्प असेल’नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने हे शिल्प बसविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच नव्हेतर, संपूर्ण देशात असे देखणे शिल्प साकारणारी ठाणे ही पहिलीच महापालिका असेल, असा विश्वास महापौर म्हस्के यांनी या वेळी व्यक्त केला.