अजित मांडके/ ठाणेएकनाथ शिंदे फ्रेश होतात. प्रचाराच्या रणधुमाळीचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत असतो. शिंदे बाहेर येताच साहेब, थोडं खाऊन घ्या, असं सांगत एक सहकारी सुकी भेळ पुढे करतो. शिंदे भेळीचे एकदोन घास पोटात ढकलतात. तेवढ्यात, त्यांचे लक्ष घड्याळाकडे जाते. पुढील चौक सभांचे नियोजन कसे आहे, त्याची माहिती घेतात. नियोजनाबाबत काही सूचना करतात. मग, त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होतो.सकाळी ७ पासूनच शिंदे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असते. पहाटे घरी येऊन झोपलेले शिंदे ९ वाजता बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करतात. कुठल्या उमेदवाराच्या वॉर्डात जोर लावला पाहिजे, कुठे उमेदवार आणि पदाधिकारी यांच्यात काही गैरसमज झाले असतील, तर ते लागलीच फोनवर बोलून किंवा प्रत्यक्ष बोलवून दूर केले पाहिजेत, अशा एक ना अनेक विषयांना ते सामोरे जातात. दुपारी १.३० वाजता कोपरी येथे मेळावा असतो. मग, गाड्यांचा ताफा निघतो. शिंदे मेळाव्यात मार्गदर्शनाला उभे राहतात. काय बोलायचे, काय सांगायचे, कुणाच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि कुणाला हसतहसत कामाला लागण्याचा संदेश द्यायचा, हे एखादी स्क्रिप्ट लिहिल्यासारखं शिंदे करतात. त्यानंतर, मग रांगेने चौक सभा सुुरू होतात. एक सभा संपवून गाडीत येऊन बसल्यावर ‘आता कुठे आहे रे सभा’, असे ते हमखास विचारत होते. पुढच्या सभास्थानी पोहोचण्यास उशीर होत असेल, तर लागलीच शिंदे तेथील प्रमुख पदाधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगत होते. सध्या कोण बोलतोय? त्याला सांगा भाषण सुरू ठेव, असा मेसेज देत होते. शिंदे यांच्या फोनला क्षणाची उसंत नव्हती, तो सतत खणखणत होता. मोटार वाहतूककोंडीत अडकली, तर फोनवर बोलत असतानाच अरे, इकडे उजवीकडून काढ ना, हॉर्न दे, असं सांगत कोंडीतून मार्ग कसा काढायचा, याची सूचना करत होते. शिंदे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यावर पदाधिकारी त्यांच्या स्वागताकरिता पुढे सरसावले. आता प्रचंड रेटारेटी सुरू झाली. त्या गर्दीत कुणी शिंदे यांच्या पाया पडत होते, तर कुणी हस्तांदोलन करायला धडपडत होते. शिंदेंचे सुरक्षारक्षक त्यांच्या दिशेने झेपावणाऱ्या कार्यकर्त्यांना हळूहळू मागे रेटत गर्दीतून वाट काढतात. शिंदे हसतमुखाने पुढे सरकत व्यासपीठावर जातात. ते व्यासपीठावर दाखल होताच वक्ता भाषण आटोपते घेत घोषणा देतो. लागलीच शिंदे बोलायला उभे राहतात. भास्करनगर येथील मच्छी मार्केटच्या ठिकाणी सभा असल्याने लागलीच तेथे केलेल्या कामांची आठवण करून देतात. ज्या समस्या सोडवायच्या आहेत, त्याबाबत उमेदवाराच्या वतीने शब्द देतात.मुंब्य्रातील कोळीवाड्याकडे ते सभेला दाखल होतात, तर समोर राष्ट्रवादीची सभा सुरू असते. स्वागतासाठी सुरू झालेली फटाक्यांची आतषबाजी थांबता थांबत नाही म्हटल्यावर फटाके वाजत असतानाही व्यासपीठ गाठतात. कोळीबांधवांचा, त्यांच्या समस्यांचा आवर्जून उल्लेख करतात. भाषण करताना लक्ष सतत घड्याळाकडे. पुढील गोकूळनगरातील सभा रात्री १० पूर्वी त्यांना पूर्ण करायची असते. गोकूळनगरात पुन्हा तेच दृश्य... गर्दी, फटाके, पाया पडण्याकरिता रेटारेटी. भाजपावर तोफ डागत, सेनेने केलेल्या कामांची जंत्री मांडत ते बोलत असतात. भाषणात कधी ते कडवट होतात, तर कधी हास्यविनोद करीत विरोधकांवर अथवा विरोधी उमेदवारावर शाब्दिक हल्ला चढवतात.सभा संपल्यावर परिसरातील वयोवृद्ध चाचा जानच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इमारतीचे मजले चढून जातात. शिंदे आल्याने इमारतीमधील लोक गॅलरी, खिडक्यांत उभे असतात. मागोमाग कार्यकर्त्यांचा फौजफाटा चाचा जानच्या घरापाशी पोहोचतो आणि त्यांचे छोटे घर माणसांनी भरून जाते. ‘चाचा कसे आहात, तब्बेत कशी आहे, त्यांची काळजी घ्या आणि उद्याच रुग्णालयात घेऊन जा. काही मदत लागली, तर मला सांगा’, हे सांगण्यास शिंदे विसरत नाहीत.
घड्याळाच्या काट्यावर धावणारा ‘शिवसैनिक’
By admin | Published: February 17, 2017 1:59 AM