ठाणे : येत्या अर्थसंकल्पात ठाणेकरांनी केलेल्या सूचनांचा समावेश करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. परंतु हा निर्णय घेत असतानाच नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधीला टाच लावण्याचाही प्रयत्न केला आहे. आता या निर्णयाच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार असून पालिका आयुक्तांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पाच वर्ष व्हिजन प्रकल्पाला आणि परस्पर घेतलेल्या निर्णयांना सभागृहात विरोध करण्याचे संकेत नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. नागरिकांच्या थेट सूचनांना विरोध नसला तरी निर्णय जाहीर करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेणेही महत्वाचे असल्याचे सांगून शिंदे यांनी प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे. ठाणे महापालिकेत गेली पाच वर्ष गाजली ती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संघर्षामुळेच. ठाण्यात एखाद्या नवीन प्रकल्पाची घोषणा करण्यावरून ते प्रकल्प राबवण्यापर्यंत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याची ओरड होत होती. सभागृहामध्येही अनेक वेळा हा संघर्ष पाहायला मिळाला. सत्तेमध्ये असतानाही शिवसेनेला नमती भूमिका घ्यावी लागली होती. यावेळी मात्र महापौरांच्या माध्यमातून शिवसेना अधिक आक्रमक होण्याची चिन्हे असून आयुक्तांनी जाहीर केलेल्या दोन महत्वाच्या निर्णयांना सभागृहात विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)पाच वर्ष आम्ही काय करायचं? आयुक्तांनी एखाद्या प्रकल्पाचे पाच वर्षाचे व्हीजन असावे असे जाहीर करून प्रभाग स्तरावर याचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये थेट नागरिकांचा सहभाग लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय जाहीर केल्याने या निर्णयाला विरोध होण्याची चिन्हे आहेत. सर्व निर्णय आयुक्त घेत असतील तर लोकप्रतिनिधी पाच वर्ष काय करणार असा प्रश्न उपस्थित करून महापौरही या मुद्दयावर आक्र मक होण्याची चिन्हे आहेत.
आयुक्तांच्या व्हिजनवर शिवसेना आक्रमक
By admin | Published: March 08, 2017 4:19 AM