उल्हासनगर कॅम्प-४ हा भाग मराठी लोकवस्तीचा असला, तरी या परिसराला लागून असलेल्या भागांचा विचार करता शिवसेनेसोबत भाजपालाही या ठिकाणी वर्चस्व निर्माण करता आले आहे. पॅनल क्रमांक १९ मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांनी विजयी होऊन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व निर्माण केले. असे असले तरी हा प्रभाग सोडता सर्व ठिकाणी शिवसेनेचा जल्लोष दिसत होता. मराठी वस्ती ही कॅम्प-४ परिसरात सर्वाधिक असल्याने शिवसेनेने या ठिकाणी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. पॅनल क्रमांक ४, १०, १३, १४, १५ मध्ये शिवसेनेने एकहाती वर्चस्व निर्माण करून सर्वच्या सर्व पॅनलवर विजय मिळवला. त्यामुळे या भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सर्वाधिक दिसत होता. मिरवणुकीवर बंदी असल्याने विजयी उमेदवारांनी प्रभागातून प्रभातफेरी काढून जल्लोष साजरा केला. फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. प्रभागात सर्व नागरिकांना मिठाई पाठवून तोंड गोड करण्यास उमेदवार विसरले नाहीत. उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांचा आनंद सर्वाधिक दिसत होता. निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून असलेल्या महिला कार्यकर्त्यादेखील आपला उमेदवार विजयी झाल्यावर जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. शिवसेनेसोबत भाजपानेदेखील काही प्रभागांत वर्चस्व निर्माण केल्याने त्या ठिकाणीही कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजय पाटील आणि त्यांच्या पॅनलमधील विजयी उमेदवारांनीदेखील प्रभागात मतदारांच्या भेटी घेऊन आभार व्यक्त केले. कार्यकर्त्यांचा मोठा ताफा मागे असल्याने या भेटीला विजयी रॅलीचे स्वरूप आले होते.
उल्हासनगरमध्ये मराठी वस्तीत शिवसेना-भाजपाचे वर्चस्व
By admin | Published: February 24, 2017 7:29 AM