डोंबिवली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबई, कल्याण आणि पुण्यात विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, कल्याणमधील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर भाजपाच्या मित्रपक्ष शिवसेना बहिष्कार घालणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये या आशयाचे मेसेजदेखील व्हायरल झाले आहेत. पण याबाबत अद्यापपर्यंत अधिकृतपणे प्रतिक्रिया मात्र मिळू शकलेली नाही.
(कल्याणमध्ये चोहीकडे ‘कमळ’, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत)
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र दोन दिवसांपूर्वी मोदींच्या कार्यक्रमात काय भाषण करावे या संदर्भात टिपण तयार केले होते, मात्र कोस्टल रोडच्या शुभारंभ नाट्यवरून भाजपाने बहिष्कार टाकल्यानंतर सोमवारी काही विशेष घडामोडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच मोदींच्या उपक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बोलावण्यात आलेलं नाही, त्यामुळेही या कार्यक्रमाला जायचे? का असा सवाल शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थित केला होता.
तसेच या कार्यक्रमासाठीच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार भोईर यांचे नाव नसल्याने त्यांनी आधीच बहिष्कार टाकल्याची माहिती लोकमतला दिली होती. दरम्यान, पालकमंत्री शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, ते मोदींच्या कार्यक्रमाला जाणार आहेत की नाही? याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम
मोदी सकाळी हॉटेल ताज येथील रिपब्लिक समिटमध्ये सहभागी होतील. त्यानंतर राजभवन येथील टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहतील. यानंतर ते कल्याण येथे मेट्रो प्रकल्प व गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.पंतप्रधान पुण्यात तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करणार आहेत.