कल्याण : शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींची पुरती उपेक्षा झाली असून योजनांसाठी राखीव ठेवलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिव्यांग सेना या संघटनेच्यावतीने रविवारी करण्यात आला. दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता २० दिवसांमध्ये करण्यात यावी अन्यथा २१ आॅक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दिव्यांगांचा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिली. कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेल्या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे होत नसल्याचे संबंधित महापालिकांमधून दिसून आले आहे. मुंबई महापालिकेत तीन कोटीचा निधी वापरलाच गेलेला नाही तर उर्वरित महापालिका आणि नगरपालिकांमध्ये हा निधी चुकीच्या पध्दतीने वापरला जात आहे. पायवाटा आणि गटार बांधणीसाठी नगरसेवक, आमदार तसेच खासदार निधी वापरणे शक्य असताना त्यासाठी दिव्यांग निधीचा वापर करण्यात आल्याचे माहीती अधिकारात कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे.दिव्यांगांचे नेमके किती प्रकार आहेत याची माहितीही अधिकाऱ्यांना नसल्याचा आरोप साळवी यांनी केला. कर्णबधिर आणि अंधांची यात पुर्णपणे दिशाभूल केली जात असून जे बचतगट स्थापन केले गेले आहेत त्यात केवळ कल्याणच्या संस्थांचाच समावेश आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दिव्यांग योजनेचा लाभ हा केवळ दिव्यांग बेरोजगारांना मिळणे बंधनकारक असताना प्रशासनातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाºयांना साहित्यांचे वाटप करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे साळवी यांनी सांगितले.दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षही उघडण्यात आलेला नाही. हीच परिस्थिती अन्य महापालिका आणि नगरपालिकांमध्येही असून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. वारंवार पत्रव्यवहार आणि निदर्शनास आणूनही फरक पडत नसल्याने आता मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. न्याय मिळाला नाहीतर २१ आॅक्टोबरला मातोश्रीवर मोर्चा काढणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली.साहित्य वाटले, पण रोजगाराचे काय?खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांगांना साहित्य वाटले हे निश्चितच चांगले आहे पण नुसते साहित्य वाटू नका ते नगरसेवकही वाटतात. दिव्यांगांना रोजगार मिळण्यासाठी शिंदे यांनी किती प्रयत्न केले? असा सवाल साळवी यांनी केला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी दिव्यांगांना रोजगार मिळून देण्यासाठी विशेष काम केले आहे. त्यांच्याकडून खासदारांनी सल्ला घ्यावा, महापालिकांमध्ये सत्ता असताना दिव्यांगांसाठीच्या राखीव निधीचा वापर होत नाही हे खासदारांना बोलावे लागते ही त्यांच्यासाठी शरमेची बाब असल्याचे साळवी म्हणाले.