ठाणे: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनाधिकृत इमारत बांधलेली नाही. विहंग गार्डन या इमारतींची तक्रार केलेली चुकीची असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करतांना, अनाधिकृतरित्या केलेले नाही आणि करणार ही नाही. असे सांगतांनाच किरीट सोमय्या यांनी जे काही बदनामी केलेली आहे, त्याच्याविरोधात आता थेट न्यायालयात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विहंग गार्डनच्या बाबतीत 'खोदा पहाड निकला चुहा' अशी म्हणण्याची वेळ आता सोमय्या यांच्यावर आल्याची टिकाही त्यांनी केली.
१० वर्षापूर्वी आम्ही विहंग गार्डन या इमारती बांधल्या. या इमारती बांधत असतांना महापालिकेला शाळेची इमारत बांधून दिली, त्या बदल्यात टिडीआर देणो बाकी असतांना आम्ही आधी ती इमारत बांधल्याने आम्हाला तत्कालीन आयुक्तांनी तशी नोटीस बजावली होती. परंतु महापालिकेला जी इमारत बांधून दिलेली आहे, त्याच्या टिडीआरच्या मोबदल्या यामध्ये या इमारतींचे बांधकाम केलेले आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी ती नोटीस मागे घेऊन आमच्या इमारती अधिकृत असल्याचा निवार्ळा दिला आहे. तसे सर्टीफीकेट दिले, त्यानंतर आम्ही घरे विकली आहेत. किंबुहना त्याच इमारतीत माझे कार्यालय देखील असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. परंतु केवळ जाणीवपूर्वक ईडीच्या फेऱ्याच अडकलेल्या सरनाईक यांच्यावर कधी पाकीस्तानी क्रेडीट कार्ड मिळाले म्हणून तर कधी दाऊद इब्राहीमशी संबध आहे, तर कधी इंटरनॅशनल लेव्हलच्या व्यावसायिकांबरोबर संबध आहेत, फ्रान्सच्या काही राष्ट्रध्यक्षांबरोबर माझी पार्टनशीप फर्म आहे.
ठाण्यात व्यावसायिक बागीदारी आहे, असे बिनबुडाचे आरोप मागील १० ते २० दिवसांपासून भाजपच्या मंडळींकडून सुरु आहेत. त्यातही इतिहासाची माहिती देखील नसतांना तानाजी मालुसरे या एका शुरवीर योध्याची तुलना कुठल्यातरी गोष्टीमध्ये करुन माझ्या तोंडात काय तरी वाक्य टाकायचे. त्यानंतर त्याचा प्रसार माध्यमांमध्ये करायचा आणि माझी बदनामी कशी होईल असेच कृत्य गेलेल्या काही दिवसापासून सुरु आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी देखील अशीच कृत्ये मागील काही दिवसापासून केले आहे, मी प्रत्येक शंकेचे निरसरण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे. अजूनही काही शंका असतील तरी १०० वेळा येण्यास मी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकशीला सहकार्य करेल असेही स्पष्ट केले आहे. परंतु १० वर्षापूर्वीचे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी करण्याचे काम ठाण्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आणि किरीट सोमय्या यांनी सुरु केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे. त्याच्या विरोधात मी १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान विहंग गार्डनमध्ये साधा एकही अनाधिकृत मजला बांधलेला नाही. कायद्याच्या आधारे काम केले असून पालिकेने जो काही दंड ठोठावला आहे. त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु आहे. ही वस्तुस्थिती असताना देखील माझी नाहक बदनामी करण्याचे काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु शिवसेनेमुळे तुम्ही माझी खासदार झालेला आहात. त्यामुळे तुमच्यात किती हिंमत आहे. ते दाखवा मी देखील तुम्हाला पुरुन उरेल असा पलटवारही त्यांनी सोमय्या यांच्यावर केला एकूणच विहंग गार्डन इमारत बाबतीत खोदा पहाड निकला चुहा अशी गत सोमय्या यांची झाली असल्याची टिकाही सरनाईक यांनी केली.