ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी शिवसेना आणि राष्टÑवादीचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यानिमित्ताने या दोन्ही उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. अशावेळी हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर येऊ नयेत, म्हणून दोघांचेही मिरवणुकीचे मार्ग निवडणूक विभागाने वेगवेगळे केले आहेत. परंतु, दुपारी १२ चा मुहूर्त साधून दोघेही उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याने, ते एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगणार आहे. परंतु, त्याआधी आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, दोन दिवस आधीच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या शक्तिप्रदर्शनाची प्रचीती ठाणेकरांना आली होती. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे हे दोघेही एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोघांनीही स्वागतयात्रेच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागितला.
सोमवारी सकाळी पावणेदहा आणि दहाच्या सुमारास हे प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढणार आहेत.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोघांनाही वेगवेगळे मार्ग आखून देण्यात आले आहेत. परंतु, दोघेही १२ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी खरे शक्तिप्रदर्शन पाहावयास मिळणार आहे.राष्टÑवादीच्या शक्तिप्रदर्शनाला पावणेदहाच्या सुमारास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्टÑवादीच्या पक्ष कार्यालयापासून मिरवणूक सुरू होणार आहे. साधारणत: १२ वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. यावेळी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हजेरी लावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह राष्टÑवादीचे इतर पदाधिकारीही सोबत राहणार आहेत.
दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने न्यू इंग्लिश शाळेजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून सकाळी १० वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, भाजपाचे आमदार तसेच युतीमधील इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ च्याच सुमारास त्यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत दोन्ही उमेदवारांकडून १२ वाजता उमेदवारी अर्ज भरला गेला, तर यावेळी खऱ्या अर्थाने शक्तिप्रदर्शनाचे चित्र रंगणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्याअनुषंगाने यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे.
पाटील यांची आज, शिंदेंची उमेदवारी मंगळवारीकल्याण : उमेदवारी अर्ज भरण्याचे सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने कल्याण लोकसभा निवडणूक कार्यालयावर आता उमेदवारांची झुंबड पाहायला मिळणार आहे. गणरायाचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे मंगळवारच्या विनायक चतुर्थी अंगारकीचा योग साधणार आहेत. उमेदवारी दाखल करताना दोन्ही राजकीय पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून चाळीसहून अधिक उमेदवारी अर्जांचे वितरण झालेले आहे. शुक्रवारपर्यंत नऊ अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे सोमवारी सकाळी ११ वाजता डोंबिवलीतील अप्पा दातार चौकानजीक असलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत.फडके रोडवरून क्रीडासंकुलातील निवडणूक कार्यालयात ते पोहोचणार आहेत. यादरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या स्मारकासह घरडा सर्कल येथील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकालाही अभिवादन करणार आहेत.पाटील यांनी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ ते २ ही शुभवेळ ज्योतिषाकडून निर्धारित केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. श्रीकांत शिंदे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. तेसुद्धा सकाळी १० वाजता गणरायाचे दर्शन घेऊन अर्ज दाखल होण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत.यावेळी भाजप शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणुकीत खºया अर्थाने रंगत भरणार आहे.
भिवंडीत कपिल पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्जभिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील प्रांत कार्यालयात सोमवार, ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शहरातील शिवाजी चौकातून सकाळी १०.३० वाजता मिरवणूक काढण्यात येणार असून, यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, किसन कथोरे, शांताराम मोरे, रवींद्र पाठक, नरेंद्र पवार, महेश चौगुले, निरंजन डावखरे आदी उपस्थित राहणार आहेत.