Thane Lok Sabha ( Marathi News ) : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २७ एप्रिल, २८ एप्रिल आणि १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजन विचारे यांसह ४ उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज घेतलेल्या नेत्यांमध्ये भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसान पार्टी २ आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे.
भाजपच्या इच्छुकांकडून सुरू आहे प्रचार
ठाण्याचा तिढा अजून सुटला नसला, तरी भाजपचे इच्छुक संजीव नाईक यांनी मात्र जागा वाटपाआधीच उमेदवार म्हणून प्रचार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शिंदेसेनेवर उद्धवसेनेने टीकेचे बाण चालवण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करूनही बालेकिल्ला राखण्यासाठी शिंदेसेनेला झगडावे लागत आहे. नाईक भाजपमधील माजी नगरसेवक, प्रमुख लोकांच्या घरोघरी भेटीगाठी घेत आहेत. निवासी संकुलातील नागरिक, समाजातील प्रमुख मंडळींच्या भेटी घेत आहेत.
खा. विचारे यांच्यासमोर लढण्यासाठी शिंदेसेनेकडे उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपला जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नाईक यांनी उघडपणे सुरू केलेला प्रचार ही शिंदेसेनेची नामुष्की आहे, असे त्यांनी म्हटले आहे, तर शिंदे गटात गेलेल्यांची अवस्था बिकट असून, ठाण्याचा गड म्हणवणाऱ्या शिंदेसेनेला भाजप जागा सोडत नाही. मग विधानसभा आणि पालिका निवडणुकीत त्यांची अवस्था किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी, असा टोला उद्धवसेनेचे मीरा-भाईंदर उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम यांनी नुकताच लगावला होता.