ठाणे : मागील काही दिवसांपासून खारेगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार कलगीतुरा रंगला होता. शनिवारी उद्घटनाच्या दिवशी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परांच्या समोर उभे राहून तुफान घोषणाबाजी केल्याने महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांमधील पूल किती डळमळीत असल्याचे दर्शन महाराष्ट्राला घडले. ‘एकनाथ शिंदे आगे बढो’च्या घोषणा शिवसैनिक देत होते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’ या घोषणाबाजीने प्रत्युत्तर देत होते. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची तारेवरची कसरत सुरू होती. शनिवारी या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते झेंडे, बँनर घेऊन दुपारपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते. राष्ट्रवादीचे व शिवसेनेने श्रेय घेणारे बॅनर दोन्हीकडे लागल्याचे दिसत होते. राष्ट्रवादीच्या बॅनरवर ‘वचनपूर्ती’ असा उल्लेख होता, तर शिवसेनेच्या बॅनरवर ‘सततच्या पाठपुराव्याला यश’ असा उल्लेख होता. कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी कार्यकर्त्यांमध्ये तुफान घोषणायुद्धाला सुरुवात झाली. पाठपुरावा महत्त्वाचा - श्रीकांत शिंदेखारेगाव पुलासाठी यापूर्वी प्रयत्न झाले असतील, मात्र पाठपुरावा महत्त्वाचा असतो. २००८-०९ मध्ये या पुलासाठी प्रयत्न झाले. परंतु खऱ्या अर्थाने २०१४ नंतर पाठपुरावा झाला. राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव न घेता, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. कोपरीपेक्षा कळवा - मुंब्य्राला पालकमंत्र्यांनी दोन हजार कोटींचा निधी दिला असून यातून पालकमंत्री शिंदे यांचे आव्हाड यांच्यावर किती प्रेम आहे, याची जाणीव होते.जितेंद्र आव्हाड म्हणाले : एकनाथ शिंदे आणि माझी मैत्री फार वेगळी आहे, त्यांच्याकडे केव्हाही निधी मागितला तर त्यांनी तो दिला नाही, असेच कधीच घडले नाही. शिंदे आणि माझ्यात एका अबोल मैत्रीचे ऋणानुबंध आहेत, तो धागा तुटणार नाही, याची काळजी श्रीकांत शिंदे यांनी घ्यावी आणि हा धागा आणखी मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाची पत्रिका छापतांना एकदा विचारले असते तर आम्ही पुढाकार घेतला असता आणि वाद, घोषणाबाजीची वेळ आली नसती. जयंत पाटील यांच्या हातून पुलाचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा यापूर्वी आपण व्यक्त केली असली तर त्यानंतर झालेल्या वादानंतर पुन्हा मीच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे असेही स्पष्ट केले होते. आपला प्रमुख शत्रू कोण आहे, हे ओळखून आपण एकत्र येणे गरजेचे असून ठाण्यात महाविकास आघाडी व्हावी ही पूर्वीही इच्छा होती आणि आतादेखील आहे. एकनाथ शिंदे म्हणाले : शिवसेनेचे मिशन कळवा हे महाविकास आघाडीचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून आणण्याकरिता आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीदेखील मिशन वागळे राबवा आम्ही तुम्हाला अडविणार नाही. पण मिशन सोडून कमिशनला हात लावणे अयोग्य आहे, कोणावरही वैयक्तिक टीका करणे अयोग्य असून मी कधीही पालिकेत माझी फाईल मंजूर करा, असे सांगितले नाही, त्यामुळे टीका करताना सांभाळून करा. आव्हाड आणि माझी मैत्री आहे. पक्षाच्या हिताकरिता आम्ही आमच्या भूमिका बदलेल्या असतील तरी आमची मैत्री कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका निवडणुकीत काम करू या. पुलाच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधातील बॅनर लागले, घोषणाबाजी झाली, मात्र हे यापुढे करू नका.उद्घाटन नेमके कोणाच्या हस्ते..? नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दोघांनीही रिबीन धरून ठेवली होती. दोघांच्याही हातात कात्री होती. त्यामुळे उद्घाटन नेमके कोणाच्या हस्ते? हा मुद्दा गुलदस्त्यात राहिला...
ठाण्यात उड्डाणपुलावर सेना-राष्ट्रवादी आमनेसामने; आधी घोषणाबाजी नंतर गळ्यात गळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 7:20 AM