अजित मांडके, ठाणे महापौर संजय मोरे यांच्याविरोधात माजी महापौर अशोक वैती यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे उघडलेली मोहीम चर्चेत असतानाच आता काही नगरसेवकांनीही महापौरांविरोधात बाह्या सरसावल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून ही मोहीम थेट ‘मातोश्री’च्या दारात नेण्यात आल्याने शिवसेनेतील अंतर्गत खदखद, असंतोष चव्हाट्यावर आला आहे. हा वाद असाच तापला तर अप्रत्यक्षरीत्या सुरू असलेली ‘महापौर हटाव’ मोहीम जोर पकडेल, असा शिवसैनिकांचा अंदाज आहे.काही दिवसांपासून शिवसेना नगरसेवकांत अंतर्गत ठिणग्या पडत असतांनाच काही ठरावीक नगरसेवकांचीच कामे होत असल्याचे कारण पुढे करीत महापौर आणि शिवसेनेच्याच काही नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. माजी महापौर अशोक वैती यांनी सत्ताधारी शिवसेनेला जाहीररीत्या घरचा आहेर देण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेतील हा संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.अवघ्या दीड वर्षात ठाणे पालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यावर लक्ष देत भाजपने शिवसेनेच्या कामांवर नजर ठेवत त्यातील काही कामांचे श्रेय घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते लक्षात घेऊन शिवसेनेनेही कुरघोडीचा प्रयत्न सुरू केला. भाजप पालिका निवडणूक स्वबळावर लढवेल, हे सप्ष्ट आहे. त्यामुळे युतीतील हे दोन्ही पक्ष सत्तासंघर्षात उतरतील, असे मानले जात असतानाच शिवसेनेतच अंतर्गत संघर्ष पेटू लागला आहे. > नगरसेवकही आक्रमकआगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्या वाढू लागल्याने वरिष्ठ नेतेही हैराण झाले आहेत. त्यांनी काहींची मनधरणी सुरू केली आहे, तर काहींना शिवसेना स्टाइलमध्ये दम भरण्यासही सुरुवात केली आहे. त्याच वेळी शिवसेनेतील काही मंडळींनी महापौरांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केल्याने महापौर विरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक असा सत्तासंघर्ष तापल्याचे दिसते.
शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला
By admin | Published: December 25, 2015 2:27 AM