ठाणे : निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना अनेक वचने देतांनाशिवसेनेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकरात सवलतीची घोषणा केली होती. परंतु, सत्ता येताच मांडलेल्या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख न करता शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केली होती. यावरून विरोधकांनी गदारोळ करून शिवसेनेस जेरीस आणले होते. आता आणखी कुरघोडी करून ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महासभेत आणून शिवसेनेचा वचनानाचा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे ठाण्यात जकात बंद झाल्यानंतर एलबीटी आली. आता ती जाऊन जीएसटी येणार आहे. परंतु, जकात गेल्याने, पालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे जकातीपोटी मिळणारी पोकळी भरुन काढण्यासाठी पालिकेने इतर स्त्रोतांपासून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये मालमत्ताकरातील इतर करांमध्येदेखील वाढ केली आहे. प्रशासन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाच शिवसेनेने मात्र निवडणुकीपूर्वी मालमत्ताकरात सवलत देण्याची जी घोषणा केली होती. तिचा निवडणुकीनंतर सादर झालेल्या अर्थसंकल्पात साधा उल्लेखही न केल्याने विरोधकांनी यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्यानंतर या महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या महासभेतदेखील प्रशासनावर दबाव आणून सत्ताधाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेत आणलेला नाही. त्यामुळे केवळ ही निवडणुकीपुरती थापेबाजी होती का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता.परंतु याचाच फायदा उचलून राष्ट्रवादीने ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरात सवलत देण्यासंदर्भातील प्रस्तावाची दिली असून ती मान्य करून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ती महासभेत चर्चेसाठी ठेवली आहे. एकूणच शिवसेनेच्या वचननाम्याची पूर्ती राष्ट्रवादी करणार हे आता स्पष्ट होत आहे. वास्तविक सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव पटलावर आणणे अपेक्षित होते. परंतु, आता राष्ट्रवादीने यामध्ये कुरघोडी करुन श्रेय घेतले आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा वचननामा हायजॅक
By admin | Published: April 19, 2017 12:31 AM