ठाणे: बांधकाम साहित्य घेऊन भरधाव वेगाने ठाण्याकडे येणाऱ्या ट्रकने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्या जवळील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ येथे घडली. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे. तर सुदैवाने बसमधील प्रवासी जखमी झाले नसून बसच्या खिडकीच्या काचा फुटून बसचेही नुकसान झाले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये दहा प्रवासी होते. तर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती. शिवशाही बस चालक उद्धव ढाकणे (४०) हे ठाणे - नालासोपारा असे दहा प्रवासी घेऊन जात होते. त्यांची बस घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ आली असताना, समोरून भरधाव वेगाने गुजरात येथून ठाण्यातील बाळकुम येथे बांधकाम साहित्य ( रेती,माती) घेऊन ट्रक चालक शबुद्दीन खान (३८) हा येत होता. त्याचदरम्यान ट्रकने शिवशाही बसला जोरदार धडक बसली. यामध्ये बसच्या एका बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून बसचेही नुकसान झाले आहे.पण बसमधील कोणीही जखमी झाले नाही. तर ट्रकचीही काच फुटली आहे. तसेच ट्रक चाकल खान हा जखमी झाला असून त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी बसमध्ये असलेले दहा प्रवासी अचानक झालेल्या या अपघातामुळे घाबरून गेले होते. रस्त्यावर अपघातग्रस्त ट्रक उभा राहील्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह कासारवडवली पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. तसेच तातडीने पोलिसांनी क्रेन बोलवून तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यावर साधारण सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
ठाण्यात शिवशाही बसला ट्रकची धडक ; ट्रक चालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:35 AM