लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना काळात कल्याण एसटी डेपोच्या उत्पन्नाला फटका बसला. तरीदेखील बसची सेवा दिली जाती होती. ती केवळ सरकारी कर्मचारी वर्गास. आता दुसऱ्या लाटेचे कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने डेपोतून चांगल्या प्रकारे बस धावू लागलेल्या आहेत. प्रवासी वर्गालाही दिलासा मिळाला आहे. साध्या आणि निमआराम बसमधून प्रवास करण्याऐवजी प्रवासी हे शिवशाही बसमधून प्रवास करण्यास जास्त पसंती देत आहेत. या बस सुस्थितीत असल्यामुळे शिवशाहीतून प्रवास करण्याकडे त्यांचा कल आहे. कल्याण बस डेपोतून ७० बस चालविल्या जात असल्या तरी त्यापैकी केवळ १२ बस या शिवशाही आहेत. येथून केवळ पुणे आणि अलिबाग मार्गावर त्या चालविल्या जातात. नाशिक, धुळे, अहमदनगर मार्गांवरही शिवशाही चालविल्या जाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. प्रवासी भारमान हे राज्यातील सगळ्य़ा डेपोपेक्षा ठाणे जिल्ह्याचे जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातही कल्याण बस डेपोचे भारमान जास्त आहे. आजमितीस दिवसाला १५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी दररोज कल्याण बस डेपोतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे शिवशाही बसची संख्या वाढविण्यास काय हरकत आहे, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
-------------------------------------------
एकूण शिवशाही बस-१२
या मार्गावर आहेत शिवशाही
कल्याण-पुणे
कल्याण-अलिबाग
-------------------------------------------
दोन महिने सॅनिटायझेशन करण्याची गरज नाही..
राज्य परिवहन महामंडळाने एका खाजगी कंपनीमार्फत नव्या प्रकारचे निर्जंतुकीकरण करण्याचे रासायनिक द्रव उपलब्ध करून दिले आहे. त्या द्रवाने कल्याण बस डेपोतील सगळ्य़ा बसो निर्जंतुकीकरण केले आहे. किमान दोन महिने त्या द्रवाचा प्रभाव राहतो. त्यामुळे दररोज बस सॅनिटायझेशन करण्याची गरज नाही.
-------------------------------------------
सर्व मार्गांवर प्रतिसाद चांगला
सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल असल्याने एसटीतून प्रवास करण्यास १०० टक्के प्रवासी संख्येला मुभा दिलेली आहे. शिवशाही बसला चांगला प्रतिसाद आहे. कल्याण-पुणे शिवशाही चांगली चालत आहे. त्यापाठोपाठ कल्याण-अलिबाग शिवशाहीलाही प्रतिसाद आहे.
-विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण एसटी डेपो
-------------------------------------------