अंबरनाथ : येथील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या राज फासेपारधी समाजातील गरीब नागरिकांना महावितरणने वाढीव वीजबिलांचा शॉक दिला आहे. गेल्या महिन्यातही वाढीव बिले आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यातच पुन्हा दुप्पट बिलेआल्याने महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा समाजाने दिला आहे.
वाढीव बिलांच्या विरोधात सर्वत्र संताप सुरू असताना आता बारकूपाडा परिसरातील राज फासेपारधी समाजातील नागरिकांना महावितरणने मोठा शॉक दिला आहे. लहानशी खोली असलेल्या फासेपारधी समाजातील प्रत्येक घराला वाढीव बिल दिल्याने ते न भरण्याचा इशारा या समाजाने दिला आहे.एकेका घराला ७० ते ७५ हजारांचे बिल दिले गेल्याने येथील नागरिकांनी हा लढा आता एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. फासेपारधी समाजातील नागरिक हे फेरीवाल्यांसारखा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.
गेल्या पाच महिन्यांत कोणताच व्यवसाय त्यांच्या वाट्याला आलेला नाही. मात्र, महावितरण वाढीव बिल पाठवून त्रासात भर घालत आहे.याबाबत तक्रार, अर्ज देऊनही महावितरण वाढीव बिलामध्ये कपात करीत नसल्याने आता राज फासेपारधी समाजाने गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. या वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन करण्याची रूपरेषा ठरविण्यात आली. महावितरणला निवेदनाची भाषा कळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.काही नागरिकांना ४० हजार तर काही नागरिकांना ७५ हजार रुपये बिल देण्यात आले आहे. त्यामुळे हे बिल भरणार कसे, असा प्रश्न आहे.