ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरबरोबर ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत असताना आता मृतदेह बांधण्यासाठीदेखील महापालिकेकडे पीपीई किट नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्लोबल रुग्णालयात दाखल एका रुग्णाचा मृतदेह चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशवीत बांधून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन तास वाट बघूनही पीपीई किट उपलब्ध न झाल्याने अखेर हा मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत बांधावा लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता मृत्यूचा आकडाही वाढल्याचे दिसत आहे. एकाट्या जवाहरबाग स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात आता मृतदेहांना बांधण्यासाठी पीपीई किट उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली. सोमवारी ग्लोबल रुग्णालयातून चार मृतदेह जवाहरबाग स्मशानभूमीत आणले. त्यातील एक मृतदेह चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळून आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ग्लोबल रुग्णालयातून हे चार मृतदेह आणल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु पीपीई किट उपलब्ध न झाल्याने रुग्णालय प्रशासनाने तो चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधल्याचे समोर आले. पीपीई किटमध्ये मृतदेह बांधला जावा, यासाठी रुग्णाचे नातेवाईक तीन तास ताटकळले होते; परंतु तीन तासांनंतरही ते उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने असा प्रकार केला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
कुणी पीपीई किट देतं का?गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. असे असताना स्मशानभूमी किंवा शववाहिनीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेदेखील पीपीई किट नसल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने समोर आली आहे.