कल्याण : येथील पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजसमोरील डॉमिनोज सेंटरमध्ये पिझ्झा खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या पिझ्झामध्ये मेलेली माशी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी डोमिनोच्या व्यवस्थापकास जाब विचारला. नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचे यातून उघड झाले असले, तरी पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी केला आहे.
अजय आवटे हे त्यांच्या कुटुंबासोबत पिझ्झा खाण्यास मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजसमोरील डॉमिनोज सेंटरमध्ये गेले होते. आवटे यांनी दोन पिझ्झाची आॅर्डर दिली असता, त्यातील एका पिझ्झामध्ये मेलेली माशी आढळली. हा प्रकार त्यांनी तत्काळ तेथील व्यवस्थापकाच्या नजरेस आणून दिला; मात्र व्यवस्थापकाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यावर आवटे यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्याशी मोबाईलने संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. कदम यांनी लगेच उपविभाग अध्यक्षा कोमल राय, शाखाध्यक्ष वैभव देसाई यांच्यासमवेत डॉमिनोज सेंटर गाठून व्यवस्थापकाला धारेवर धरले. सेंटरच्या आतील गलिच्छ अवस्था पाहून कदम यांचा पारा चढला. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करा व हॉटेलमध्ये नियमित साफसफाई, पेस्टकंट्रोल फवारणी करण्यास त्यांनी व्यवस्थापकाला बजावले.
या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अजय आवटे यांच्यासह महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठले, परंतु पोलिसांनी पहाटे चार वाजेपर्यंत बसवून ठेवत, केवळ जबाब नोंदवून घेतल्याचा आरोप मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी केला.