ठाणे : पाच लाख रुपयांचा हुंडा पाठवून दे, अन्यथा बहिणीचे प्रेत घेऊन जा, अशा आशयाचा मेसेज भावाला पाठवून एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर येथील ही घटना आहे. याप्रकरणी 6 जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने या विवाहितेने न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. २००९ मध्ये बदलापूर येथे राहणाऱ्या मनोदीपा हिचा विवाह गोरेगाव येथील आरे वसाहत परिसरात राहणा-या संदीप या तरुणाशी झाला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसातच हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आला. तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला, असा आरोप मनोदीपानं केला आहे.
विवाहानंतर संदीपला घर घेण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतरही तो मनोदीपाच्या आईवडील आणि भावाकडे हुंड्याची मागणी करत होता. लग्नाच्या काही दिवसातच त्याने मनोदीपाच्या भावाला मोबाइलवर मेसेज करुन 5 लाख रुपये पाठवून दे, अन्यथा तुझ्या बहिणीचे प्रेत घेऊन जा, असा मेसेज पाठवून धमकी दिली. याप्रकरणी मनोदीपा हिने तिचा पती संदीप,सासू-सासरे आणि इतर अशा सहा जणांनाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी या सहा जणांविरोधात भादंवि ४९८(अ), ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला. तरीही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. त्याकरिता मनोदीपा हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त यांच्याकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.