मुंबई/ठाणे - सरकारी रुग्णालयांची दयनीय अवस्था असून अनेक ठिकाणी उपचाराअभावी रुग्णाचे, नातेवाईकांचे मोठे हाल होत असल्याचं सातत्याने पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील शिवाजी रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्वत: आमदार जितेद्र आव्हाड यांनी रुग्णालयात भेट डॉक्टर्स आणि प्रशासनाला फैलावर घेतले. येथे रविंद्र सहाने ( २२ ) सुग्रीव पाल ( ३०) आणि भाऊराव सुराडकर (४५) असे तीन जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला.
येथील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. तर, एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. त्याचे नाव समजू शकलेले नाही. या घटनांची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड रुग्णालयांत पोहचले. आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी, एका मृत रुग्णावर डॉक्टरांकडून ५ तास उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. आव्हाड यांनी कळवा येथील रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियातून दिली आहे.
मृत रुग्णावर ५ तास उपचार, डॉक्टरांची बोलती बंद
गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालयाबाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो, तळपायाची आग मस्तकात गेली. त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता.तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली, असे आव्हाड यांनी सांगितले.
दिवसभरात ५ रुग्ण दगावले
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले आहे. या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.