लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील एका महिला पोलीस अधिका-यालाही कोरोनाची लागण झाली आहे. चारच दिवसांपूर्वी मुंबईतील नागपाडा येथे डयूटीवर असलेल्या तिच्या उपनिरीक्षक पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. आता तिच्यासह तिची सासू आणि दोन वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रथमच ठाण्याच्या पोलीस वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.मुंबईतील नागपाडा येथे उपनिरीक्षक असलेल्या अधिकाºयाची ३ मे रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात डयूटीवर असलेली पोलीस अधिकारी पत्नी, आई आणि दोन वर्षांच्या मुलीला होम कॉरंटाईन करण्यात आले. ठाणे न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये राहणा-या या कुटूंबाचीही ४ मे रोजी स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यांचाही अहवाल ६ मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात या महिला अधिका-यासह सहा अधिकारी आणि २५ कर्मचारी अशा ३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी चौघे अधिकारी आणि १३ कर्मचारी हे कोरोनामुक्त झाले. आता केवळ दोन अधिकारी आणि १२ कर्मचारी हे कोरोनाबाधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.* महिला अधिका-यामुळे पोलीस नियंत्रण कक्षात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर पोलीस वसाहतीमध्येही हा पहिला शिरकाव असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे घरात लहान मुल असल्यामुळे या महिला अधिकाºयाने ब-यापैकी खबरदारी घेतली होती. पण तरीही तिला कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.