लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शीळ डायघर भागातील परिसरातील मुंब्रा पनवेल रस्त्यावर मोबाइलची जबरी चोरी करुन पसार झालेल्या अल्पवयीन चोरटयास डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून १२ मोबाइल आणि एक मोटारसायकल असा एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती डायघर पोलिसांनी गुरुवारी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका जबरी चोरीचा गुन्हा डायघर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२० रोजी दाखल आहे. मुंब्रा पनवेल रस्त्यावरील वाय जंक्शन परिसरात दोघे तरुण चोरीच्या मोबाइलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणीस यांच्या पथकाने या १७ वर्षीय आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. तो चोरीच्या मोबाइलची विक्री करीत असतांना त्याच्याकडील दुचाकीसह त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा मित्र आवेश खान याच्या मदतीने तो या दुचाकीचा वापर करुन शीळफाटा पनवेल रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून चोरी केल्याची कबूली त्याने दिली. त्याच्याकडून ९८ हजारांचे १२ मोबाइल आणि जबरी चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याची माहिती डायघर पोलिसांनी दिली.