लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्याच मित्राच्या गळयातील सोनसाखळीसाठी धनराज तरुडे (३३) यानेच अक्षय डाकी याची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची कबूली दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याने दोन मजूरांना प्रत्येकी पाच हजारांची सुपारी दिली. खूनातील सहभाग स्पष्ट झाल्याने कृष्णा घोडके (२०) आणि चंदन पासवान (२०) या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे.गेल्या तीन दिवसांपासून या खून प्रकरणाचा तपास सुरु होता. मात्र, हत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नव्हते. खूनाचा मुख्य सूत्रधार धनराज हा क्षुल्लक कारणावरुन खून केल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत होता. खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय डाकी (२०, रा. वाघबीळ, ठाणे) हा ४ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याचे वडिल हेमंत डाकी यांनी दिली होती. ओवळा, पानखंडा, वाघबीळ भागात शोध घेऊनही तो न मिळाल्याने यात घातपाताची भीती त्याच्या कुटूंबियांनी वर्तविली होती. त्यामुळे दोन पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. त्यातच अक्षय हा त्याचा मित्र धनराज याला पानखंडा येथे नेहमी भेटण्यास येत होता, अशी माहिती समोर आली. अक्षयची मोटारसायकलही पानखंडा याठिकाणी मिळाल्याने धनराजवरच पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. तो उडवाउडवीची उत्तरे देत असतांनाच एका रिक्षा चालकाने ४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता धनराज सोबत गेल्याचे सांगितले. त्यावेळी घरातून निघतांना २० लीटरचे पाण्याचे दोन रिकामे जार घेऊन रिक्षात बसलेल्या धनराजने नंतर मात्र काही अंतरावरुन भरगच्च वजनाची गोणी घेतली होती. नंतर ही गोणी अहमदाबाद हायवेजवळ ब्रिजवरुन खाडीतील पाण्यात फेकली होती. त्यानंतर धावतच रिक्षात बसला. याच घटनाक्रमाच्या आधारे पोलिसांनी खाडीतून अक्षयचा मृतदेह शोधून बाहेर काढला. आधी केवळ क्षुल्लक कारणासाठी खून केल्याचे धनराजने कबूल केले होते. सखोल चौकशीत मात्र त्याने खरा प्रकार सांगितला. काही जणांचे उसनवारीने घेतलेले ३५ हजार रुपये फेडण्यासाठी अक्षयच्या गळयातील सोनसाखळी मिळविण्याचा कट रचला. त्यासाठी धनराजने त्याचा भाऊ कृष्णा घोडके (रा. धानोरा, लातूर) आणि मित्र चंदन पासवान (रा. ओवळा, ठाणे) यांचीही मदत घेतली. त्यांना या कामासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांच्याच मदतीने धनराजने अक्षयला मारहाण करुन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खाडीत फेकल्याची कबूली दिली. धनराजला (टॅक्सी चालक) या खून प्रकरणात ७ सप्टेंबर रोजी तर कृष्णा आणि चंदन या दोघांना १० सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून अक्षयचा मोबाइल, चार तोळयांची सोनसाखळी आणि गुन्हयात वापरलेली नायलॉनची दोरी हस्तगत केली.* हा खून केल्यानंतर तीन दिवसांमध्येच धनराजला पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्यामुळे ज्या सोनसाखळीसाठी त्याने हा खून केला, तीही त्याला विकता आली नाही. ती विकता न आल्याने ज्या मजूरांना प्रत्येकी पाच हजारांची त्याने खूनामध्ये मदत करण्यासाठी ‘बोली’ केली होती. त्यांनाही ते पैसे मिळाले नाही.* अत्यंत संवेदनशील या खून प्रकरणाचा मोठया कौशल्याने तपास केल्याबद्दल पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे आणि पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, शीतल चौगुले, पालवे तसेच उपनिरीक्षक कुलदीप मोरे, रुपाली रत्ने, पोलीस हवालदार अंकुश पाटील, एस. बी. खरात, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत गायकवाड, पोलीस नाईक राजकुमार महापुरे, पी. आर. तायडे, प्रविण घोडके, महेंद्र लिंगाळे, रवींद्र रावते आणि राहूल दबडे आदींचे विशेष कौतुक केले आहे.
धक्कादायक! अखेर खूनाचे गूढ उकलले: कर्जबाजारी झाल्याने सोनसाखळी मिळविण्यासाठी केली मित्राचीच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 8:00 PM
अवघ्या ३५ हजारांचे कर्ज फेडण्यासाठी मित्राचाच दोन साथीदारांच्या मदतीने रस्सीने गळा आवळून खून केल्याची कबूली धनराज तरुडे याने दिली. धनराजसह तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार तोळयांची सोनसाखळी आणि मोबाइल आणि खूनासाठी वापरलेली नॉयलॉनची दोरीही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देअवघ्या दहा हजारांमध्ये दिली मजूरांना ‘सुपारी’रस्सीने गळा आवळून केला खूनठाण्याच्या वाघबीळमधील घटना