लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : करोडोंच्या मालमत्तेच्या मालकिणीच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिच्या मालमत्तेमध्ये आपल्यालाही काही वाटा मिळेल, या लालसेपोटी व्यवस्थापकाने तिचा छळ सुरू केला. याच छळाला कंटाळून तानाजी जावीर (४८) या व्यवस्थापकाचा खून करणार्या कल्पना बळीराम नागलकर (४५) या मिहलेसह चौघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या चौघांनाही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कासारवडवलीतील कल्पना नागलकर यांच्या पतीचे सहा मिहन्यांपूर्वी निधन झाले होते. गेल्या काही वर्षांपासून नागलकर यांच्याकडे मालमत्तेची देखभाल करणा-या तानाजी याच्यासोबत कल्पना यांचे क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. त्यात या संपूर्ण मालमत्तेमध्ये आपल्यालाही काही वाटा मिळेल, अशी अपेक्षा तानाजीला होती. यातूनच या दोघांमधील वाद विकोपाला गेले होते. अखेर, त्याचा काटा काढण्याचे कल्पनाने ठरविले. त्यासाठी तिने गीता आरोळकर हिला एक लाख ४० हजारांची हत्येची सुपारी दिली. गीताने संतोष घुगरे आणि मंगेश मुरूडकर या दोघांना तानाजीच्या हत्येसाठी तयार केले. या दोघांनी तानाजीला १७ जुलै २०२० रोजी गायमुख खाडीकिनारी दारू पिण्याच्या बहाण्याने नेले. तिथे दारूत विषारी पदार्थ मिसळून त्याची हत्या केली. त्यानंतर, तानाजीचा मृतदेह गायमुख खाडीकिनारी निर्जनस्थळी फेकून दिला. दरम्यान, तानाजी घरी न परतल्यामुळे त्याचा लहान भाऊ अनिल जावीर (३८) यांनी २३ जुलै रोजी तो बेपत्ता असल्याची तक्र ार कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने संतोष घुगरे (३०), मंगेश मुरूडकर (३५), गीता आरोळकर (४५) आणि कल्पना बळीराम नागलकर (४५) या चौघांना २४ नोव्हेंबर रोजी अटक केली. कल्पनासह चौघांनीही या हत्येची पोलिसांना कबुली दिली आहे.