उल्हासनगर: कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या बहिणीला संशयातून सतत चार दिवस भावाने लोखंडी सळईने सर्वांगावर मारहाण केल्याने बहिणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी भावाला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत भावाला पोलीस कस्टडी देण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात भाऊ व वहिनी सोबत राहणाऱ्या १२ वर्षीय बहिणीच्या गुप्तांगातून रक्त जाते. यासंशयावरून सतत चार दिवसांपासून लोखंडी सळई, लाथा बुक्क्या, लोखंडी काठीने मारहाण केली. सततची मारहाण व उपाशी असल्याने, रविवारी ती बेशुद्ध झाली. बहीण बेशुद्ध झाल्याने, घाबरलेल्या भावाने बहिणीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. मृत मुलीच्या अंगभर मारहाणीचे वळ असल्याची माहिती डॉक्टरांनी मध्यवर्ती पोलिसांना दिल्यावर, पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलीच्या मृत्यू बाबत भावाला विचारपूस केली असता, मारहाण केल्याची कबुली दिली.
अल्पवयीन १२ वर्षाच्या बहिणीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याची माहिती भावाला मिळाल्यावर, त्याने याबाबत बहिणीकडे विचारपूस केली. मात्र तीला याबाबत निश्चित सांगता न आल्याने, भावाने तिला संशयातून सतत चार दिवस मारहाण केली. पाणी अन्न विना असलेली बहीण मारहाणीत बेशुद्ध झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला असावा. असे मत मध्यवर्ती रुग्णालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. प्रत्यक्षात मुलीला मासिक पाळी आल्याने, गुप्तांगातून रक्त येत होते. मात्र तिला भावाला निश्चित सांगता न आल्याने, तसेच भावाने कोणताच विचार न करता संशय घेऊन सतत मारहाण केल्याने, तिचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेश येथे राहणाऱ्या मृत मुलीच्या आई-वडिलांना याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी निघाल्याचे पोलीस अधिकारी कड यांनी सांगितले. भावाच्या संशयखोर वृत्तीमुळेच बहिणीचा मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तसेच न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
मासिक पाळी न समजल्याने गेला जीव १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळी आल्याचे, सांगता न आल्याने, संशयातून मुलीला भावाने मारहाण केली. मात्र या अघोरी मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याने, सर्वस्तरांतून निषेध होत आहे.