ठाणे: मुलाचे आणि पतीचेही चांगले होऊन घरात सुखमृद्धी येईल, असा दावा करीत वेगवेगळया पूजा करण्याच्या तसेच ताईत घालण्यास देण्याच्या नावाखाली कळव्यातील एका महिलेला तब्बल १५ लाखांना गंडा घालणाऱ्या राहूल मोरे (२६) या भोंदू बाबाला जादू टोणा प्रतिबंधक कायद्याखाली कळवा पोलिसांनी सोमवारी जळगावातून अटक केली. त्याच्या अन्य एका साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.स्वाती पवार (रा. वृंदावन सोसायटी, राबोडी, ठाणे) या महिलेच्या मुलाचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. मुलावर अचानक कशामुळे संकट ओढवले? या चिंतेने ग्रासलेल्या या महिलेला ठाण्याच्या माजीवडा येथील गणेश साळुंखे याच्याकडे जाण्याचा सल्ला एका महिलेने दिला. त्याने संकट निवारण करण्यासाठी त्याच भागातील राहूल मोरे या बाबाचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्याच्या सांगण्यानुसार साळुंखे हा कळव्यातील तिच्या मनिषानगर येथील पार्लरमध्ये आला. कशामुळे मुलाला हा अपघात झाला ? त्याच्यावर कोणते संकट आहे? शनीची कसली पिडा वगैरे असे प्रश्न तिने विचारुन त्याच्याकडे सल्ला मागितला. तेंव्हा आयतेच गिºहाईक मिळाल्यामुळे ‘बाबाने’ही सर्व संकटांचे निवारण होईल, काही मंत्रांचे जप करावे लागतील, असे सांगून तिच्याकडून सुरुवातीला दहा हजार रुपये काढले. पुढे अशाच वेगवेगळया कारणांनी कथित मोरे बाबांनी घरातील सुखसमृद्धीसाठी तिच्याकडून ५ डिसेंबर २०१७ ते १७ जून २०१९ या काळात थोडे थोडे करुन सुमारे १५ लाखांची रोकड उकळली. तिच्यावरील परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिला भावनाविवश करुन तिला ताईत घालण्यासाठी देत संभ्रमित केले. यामध्ये तिने स्वत:चे सोन्याचे दागिनेही गहाण ठेवले. या भोंदू बाबामुळे आपली पूर्णपणे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी या प्रकरणी १७ जून २०१९ रोजी साळुंखे आणि त्याचा साथीदार राहूल मोरे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि महाराष्टÑ जादू टोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांच्या पथकाने ७ जुलै रोजी गणेश साळुंखे याला अटक केली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे जळगाव जिल्हयातून १५ जुलै रोजी राहूल मोरे या भोंदू बाबालाही जमादार मंगेश महाजन, पोलीस शिपाई प्रभू नाईक आणि सुरेश जाधव यांच्या पथकाने जळगाव येथून अटक केली.
धक्कादायक! ठाण्यातील महिलेला १५ लाखांचा गंडा: भोंदू बाबाला जळगावातून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: July 15, 2019 10:21 PM
मुलाला झालेल्या अपघाताने काळजीत पडलेल्या राबोडीतील महिलेने राहूल मोरे या भोंदू बाबाचा आधार घेतला. मात्र, त्याने तिला सुमारे १५ लाखांना गंडा घातला. आता राहूलसह दोघांना कळवा पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर महाराष्टÑ जादू टोणा प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली आहे.
ठळक मुद्देजादू टोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखलकळवा पोलिसांची कारवाईताईत घालण्यास देण्याच्या नावाखाली केली लूट