कर्जत - पबजी गेम खेळण्याच्या व्यसनामुळे कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील तरुणाने आपला जीव गमावला आहे. सुयोग अरुण क्षीरसागर (२३) असं या तरुणाचं नाव आहे. या गेममुळे तालुक्यात जीव गमवावा लागलेला सुयोग हा तिसरा तरुण आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील व्यावसायिक अरुण क्षीरसागर यांचा मुलगा सुयोग हा गेल्या वर्षांपासून पबजी गेमच्या आहारी गेला होता. नंतर त्याला पबजी गेमचे व्यसन जडले. बारावीच्या शिक्षणानंतर वडिलांना व्यवसायात तो मदत करू लागला होता. गेल्या दोन वर्षांमध्ये अँड्रॉईड मोबाईल खरेदी करून इतर मित्रांचे पाहून तोही पबजी गेम खेळू लागला. दरम्यान, पबजी खेळण्याचे व्यसन जडले. दुकानात वेळ मिळाल्यानंतर तो पबजी गेममध्ये डोकं खुपसून असे. गेल्या पंधरा दिवसांपासून तो मनोरुग्ण अवस्थेत गेला आणि काहीही न बोलता गावामध्ये रात्रंदिवस फिरू लागला. ८ दिवसांपूर्वी उपचारासाठी त्याच्या आई - वडिल्यांनी त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अखेर त्याचा मृत्यू झाला.