- पंकज रोडेकर
ठाणे: लोकलच्या डब्यामध्ये आत चढतेवेळी पायाचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुंब्र्यातील जासिर शेख (19) या तरुणाला बदलापूर(स्लो) लोकलमधून खाली ढकलल्याल्याची घटना मंगळवारी रात्री कळवा-खारेगाव फाटकदरम्यान घडली. यामध्ये जासिर हा जखमी झाला आहे.
मंगळवारी जासिर हा कामानिमित्त दादर येथे गेला होता. तेथून येताना तो फ़ास्ट लोकलने ठाण्यात आला. मुंब्र्यात जाण्यासाठी 2 नंबर फलाट वरुन 10.28 ची स्लो बदलापूर लोकल पकडली. याचवेळी लोकलमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला त्याच्या पायाचा धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. त्यावेळी डब्यातील इतर प्रवाशांनी वाद सोडवला. कळवा स्टेशन सुटल्यावर आरोपीचा पाय जखमी शेख याच्या पायावर पडत होता. त्याबाबत सांगितल्यावर पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. याचवेळी दरवाजात उभ्या असलेल्या जासिर याला आरोपीने लाथ मारून धावत्या लोकलमधून खाली पाडले.
दरम्यान, त्याचवेळी नागरिकांनी कळवा स्टेशन येथे एका नागरिकाला पकडून त्याला पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र जासिर याला लाथ मारणारा तो व्यक्ती नसलेल्याचे त्याने सांगितले. लाथ मारणारा दारुच्या नशेत असल्याचे समजते. तर, जासिर याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्याला ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी त्या अनोळखी व्यक्तीविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र शिरतोडे यांनी दिली.