अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, आता नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यातच आता नागरिकांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारी नारायणनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. नगरसेवकांनीही प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. अखेर अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले असून, आठ दिवसांत पाणी समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.चिंचपाडा, नालंदानगर, नारायणनगर, कोहोजगाव, कमलाकगरनगर, वांद्रापाडा, उलनचाळ परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केले. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीजवळ आंदोलन केले. यावेळी पाटील, चरण रसाळ, उमेश पाटील यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक रहिवाशांनीही समर्थन देत त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत या आंदोलनकर्त्यांना खाली उतरविले. जोपर्यंत नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका पाटील यांनी घेत पाण्याच्या टाकीखाली आंदोलन सुरू केले. या ठिय्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. मात्र, पाणी नाही, तर आंदोलनही मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.घेराव घालण्याचा दिला इशारागुरुवारीही काही नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, त्या आंदोलनाला २४ तास उलटत नाही तो पुन्हा आंदोलन करण्याची वेळ नगरसेवकांवर आली आहे. शहरात पाणीसमस्या वाढत असतानाही अधिकारी त्याकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात आंदोलनाची मालिकाच सुरू होणार हे निश्चित, तर दुसरीकडे आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
पाण्यासाठी नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 1:16 AM