नालासोपारा (मंगेश कराळे) :- पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट करुन इंटरनेट वेबसाईटवर अपलोड करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
वसईत राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला व साथीदाराला चित्रपटात काम देतो असे सांगून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. महिला मेकअप आर्टिस्टने पीडित तरुणीला १ नोव्हेंबरला व्हॉट्सऍप कॉल करून चित्रपटात काम देते या बहाण्याने ऑडीशन करता अर्नाळा येथील बीच समोरील जे. के. व्हिला हॉटेल मार्टीन इनमध्ये बोलावून घेतले होते. महिला मेकअप आर्टिस्टचे आरोपी मित्र डायरेक्टर आणि कॅमेरामॅन यांनी ऑडिशनच्या बहाण्याने संभोग करतानाचा तयार केलेला नग्न व्हिडीओ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या इंटरनेट वेबसाईटवर प्रदर्शित करत समाजात बदनामी केली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी १२ डिसेंबरल गुन्हा दाखल केला होता.
दाखल गुन्ह्याची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे देण्यात आला. गुन्हयातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरुन आरोपी अनुजकुमार जयप्रकाश जयस्वाल (३०) आणि २३ वर्षीय तरुणीला अटक करून चौकशी केली. त्यांनतर गुन्हयातील पाहिजे आरोपीला बदलापूर येथून सर्जु कुमार रमाकांत विश्वकर्मा (२५) याला अटक करण्यात आली. अटक आरोपीकडून पोनोग्राफी व्हिडीओ शुटींग करीता लागणारे मोचाईल फोन, लॅपटॉप, शुटींग करणे करीता लागणारे ट्रायपॉड, गिंबल, शूटींग लाईट इत्यादी असा १ लाख १० हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक आरोपीना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर होता.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मनोज सकपाळ, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब. गणेश यादव, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.